लोकराजाच्या चरणी कोल्हापूर नतमस्तक

लोकराजाच्या चरणी कोल्हापूर नतमस्तक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
'राजर्षी शाहू के सन्मान में जनसागर मैदान में…', 'लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय…' यासह विविध घोषणा, शांततेचे प्रतीक पांढरी टोपी आणि पांढरे कपडे परिधान केलेले हजारो आबालवृद्ध शाहूप्रेमी, राजर्षींच्या पुरोगामी विचारांची मशाल घेऊन जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले विविध जाती-धर्मीय शाहू विचारांचे पाईक, अशा शिस्तबद्ध वातावरणात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू यांना त्यांच्या स्मृती शताब्दीदिनी (6 मे) अभिवादन करण्यात आले. लोकराजाच्या चरणी कोल्हापूर नतमस्तक झाले. शंभर सेकंद स्तब्धता पाळून तमाम जनतेने राजर्षींना अभिवादन केले.

लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य जनतेने नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधिस्थळी शुक्रवारी सकाळी 10 वाजता, 100 सेकंद स्तब्ध राहून कृतज्ञता व्यक्‍त केली. यावेळी संपूर्ण परिसरात नीरव शांतता होती. केवळ पक्ष्यांचा किलबिलाटच ऐकू येत होता. अभिवादनाच्या 100 सेकंदात शाहूप्रेमींनी राजर्षींनी शंभर वर्षांपूर्वी दूरद‍ृष्टीने लोककल्याणासाठी केलेल्या विविध कार्यांना उजाळा दिला. इतकेच नव्हे, तर राजर्षींच्या कार्याचा हा वारसा अखंड पुढे सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्‍त केला.

मान्यवरांनी वाहिले पुष्पचक्र

राजर्षी शाहू समाधिस्थळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून लोकराजाला मानवंदना दिली. यावेळी शाहू महाराज, दै. 'पुढारी'चे मुख्य संपादकडॉ. प्रतापसिंह जाधव, 'पुढारी' पेपर्सचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार संभाजीराजे, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, आ. राजू आवळे, आ. प्रकाश आबिटकर, आ. जयश्री जाधव, माजी आ. मालोजीराजे, मधुरिमाराजे, जि.प. माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीचे वसंतराव मुळीक व बबनराव रानगे, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, शाहू समाधीचे आर्किटेक्ट अभिजित जाधव-कसबेकर, अमितकुमार गाट, युवराज बरगे यांच्यासह संपूर्ण जिल्हा, विविध तालुके, ग्रामपंचायती संस्था-संघटना, तालीम मंडळे, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांच्यासह शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध मार्गांवरून शाहू ज्योत

शहरातील पाण्याचा खजिना, शाहू जन्मस्थळ, कसबा बावडा, नवीन राजवाडा, रेल्वेस्टेशन, कसबा बावडा फुटबॉल क्लबचे खेळाडू आणि कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनचे कलाकार ज्योत घेऊन आले. शाहू मिल येथून संयुक्‍त राजारामपुरीचे कार्यकर्ते, तर सोनतळी येथून वडणगे फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी समाधिस्थळी ज्योत आणली.

अभिवादनासाठी दिवसभर रीघ

नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी सकाळी 7 वाजल्यापासून शाहूप्रेमींनी अभिवादनासाठी शाहू समाधिस्थळी गर्दी केली होती. 10 वाजता मुख्य अभिवादन आणि 100 सेकंद कृतज्ञतेसाठी स्तब्धता पाळण्यात आली. यानंतर रात्री उशिरापर्यंत शाहू समाधिस्थळी अभिवादनासाठी रीघ लागली होती. शाहू समाधी दर्शनाबरोबरच शिवछत्रपती व ताराराणी स्मृती मंदिरांनाही आवर्जून अभिवादन करण्यात आले.

छत्रपती शाहू विद्यालयाच्याविद्यार्थ्यांची विविधता

समाधिस्थळी छत्रपती शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. राजर्षींच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाशझोत टाकणार्‍या चित्ररथासह विद्यार्थी कार्यक्रमस्थळी आले होते. राजर्षी शाहूंसह विविध ऐतिहासिक वेशभूषांत विद्यार्थी रथात बसले होते. याशिवाय तारा कमांडो फोर्स (टीसीएफ), एअर फोर्स व एनसीसीचे सुमारे 150 विद्यार्थी-विद्यार्थिनींचा यात सहभाग होता.

शाहूप्रेमींसाठी सेवाकार्य

राजर्षींना अभिवादन करण्यासाठी उपस्थित शाहूप्रेमींच्या सेवेसाठी सेवाभावी संस्था सक्रिय होत्या. समाधिस्थळ परिसरातील उद्यानात सुमारे 5 हजार लोकांसाठी चहापानाची व्यवस्था सहज सेवा ट्रस्टने केल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष सन्मती मिरजे यांनी सांगितले. छत्रपती शिवशाहू फाऊंडेशनच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले. यावेळी सूर्यकांत गायकवाड, कैलास शिंदे, प्रवीण दुबळे, मितेश मोरे, मेहबूब जमादार, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातून 17 शाहू ज्योतींचे समाधिस्थळी आगमन

स्मृती शताब्दीनिमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुके आणि शहराच्या विविध भागांतून 5 अशा एकूण 17 शाहू ज्योती समता रॅली शाहू समाधिस्थळी आणण्यात आल्या. त्यांचे स्वागत पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

…अन् काऊंटडाऊन सुरू!

समाधिस्थळी 9 वाजल्यापासून शाहूप्रेमी मोठ्या संख्येने एकवटले होते. 9 वाजून 55 मिनिटांपासून आयोजकांनी 'काऊंटडाऊन'ची घोषणा केली. सर्वांना शिस्तबद्ध उभारण्याचे आवाहन केले. दहा वाजण्यास काही सेकंद बाकी असताना सावधान उभे राहण्यास सांगण्यात आले. त्यानंतर 100 सेकंद स्तब्धता पाळण्यात आली.

एका पायावर उभे राहून मानवंदना

राजर्षी शाहूंनी निर्माण केलेल्या कुस्ती परंपरेतील मल्ल अमितकुमार गाट याने समाधिस्थळी 100 सेकंद एका पायावर उभे राहून हात उंचावत लोकराजाला अभिवादन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news