पुणे : ‘स्प्लेंडर कंट्री’त सरकारी बाबूंचा ‘एन्जॉय’ | पुढारी

पुणे : ‘स्प्लेंडर कंट्री’त सरकारी बाबूंचा ‘एन्जॉय’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हवेली पंचायत समितीतील सरकारी बाबूंनी चक्क सल्लागार समितीची बैठक खडकवासलाजवळ असलेल्या ‘स्प्लेंडर कंट्री’त घेत ‘एन्जॉय’ केल्याने जिल्हा प्रशासनाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. स्विमिंग पूलपासून ते अगदी एन्जॉय साठी अनेक गोष्टींची रेलचेल तेथे होती. या सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये नेमके कोणते आणि कसे प्रशासकीय कामकाज झाले हे मात्र गुलदस्त्यात आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकार्‍यांच्या बैठका हॉटेल, रिसॉर्ट मुख्यालयाबाहेर घ्यायचे असतील तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. बैठका होतात आणि  गाजतात; परंतु प्रशासक राज आल्यानंतर हवेली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि प्रशासन प्रशांत शिर्के यांनी चक्क खडकवासला जलाशयाच्या तीरावर असलेल्या स्प्लेंडर कंट्री क्लमध्ये पंचायत समितीच्या सल्लागार समितीची बैठक घेऊन नवा पायंडा पाडला.

 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये प्रशासक राजवट आल्यानंतर कामकाज सोयीचे व्हावे यासाठी अधिकार्‍यांच्या सल्लागार समित्यांची रचना करण्यात आली.  पंचायत समिती  प्रशासक सल्लागार समितीची अशी शासकीय आणि प्रशासकीय बैठक पंचायत समिती मुख्यालया बाहेर तसेच खाजगी ठिकाणी घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासकांची परवानगी घेतली नव्हती.

गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के आणि सहाय्यक गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांनी प्रशासनाला याची कल्पना देखील दिली नाही. पंचायत समितीची सर्व कार्यालय बंद ठेवून अधिकारी आणि कर्मचारी या क्लबवर सकाळीच पोहोचले. काही कर्मचारी-अधिकारी सायंकाळी परतले काहीजणांनी मांडवी येथून परस्परच घर गाठले.

हवेली पंचायत समितीच्या प्रशासकांनी अशी बैठक घेण्यासाठी जिल्हा परिषदेची परवानगी घेतली नव्हती. कोणत्या अधिकारात त्यांनी अशी बैठक बाहेर घेतली. बैठक घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नव्हती, अशी माहिती जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या बैठकीसाठी झालेला खर्च कुठून केला, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व प्रशासकीय बाबींची चौकशी आणि कारवाई करण्यासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button