Latest

व्हिडिओ : श्रीलंकेत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यावेळी आंदोलकांची धडक, सनथ जयसूर्या आंदोलनात सहभागी

दीपक दि. भांदिगरे

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : श्रीलंकेत सरकारविरोधात जोरदार निदर्शने सुरु आहेत. संतप्त झालेल्या आंदोलकांनी आज राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात धडक दिली होती. राष्ट्रपती निवासस्थानावर आंदोलकांनी कब्जा केल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी निवासस्थानातून पलायन केले आहे. दरम्यान, त्यानंतर आंदोलक मोठ्या संख्येने गाले स्टेडिअम बाहेर जमा झाले. स्टेडियममध्येही काही आंदोलकांनी जाऊन घोषणाबाजी केली. या स्टेडियममध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर काही वेळातच आंदोलकांनी स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, श्रीलंकेत सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या देखील रस्त्यावर उतरला आहे. "मी या आंदोलनाचा एक भाग आहे आणि लोकांच्या मागण्यांसाठी मी त्यांच्यासोबत आहे… हे आंदोलन तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू आहे," असे  जयसूर्याने म्हटले आहे.

श्रीलंकेतील परिस्थिती पूर्णपणे बिघडली आहे. गाले स्टेडियमच्या आत आणि बाहेर आंदोलकांनी फलक झळकावत घोषणा दिल्या. पण सामन्यावर याचा परिणाम झाला नाही. आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेतील परिस्थिती अजूनही नियत्रंणात आलेली नाही. दरम्यान, शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात आंदोलकांनी प्रवेश करुन त्यांना घेराव घातला. यामुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना त्यांचे निवासस्थान सोडून पळावे लागले असल्याचे वृत्त आहे. श्रीलंकेत सरकारविरोधात निर्दशने सुरुच आहे. आज शनिवारी देखील हजारो लोक कोलंबोतील रस्त्यावर उतरले. आज आंदोलकांनी थेट राष्ट्रपती निवासस्थानात धडक दिली.  यावेळी निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

शनिवारी श्रीलंकेतील विविध भागातून हजारोच्या संख्येने आंदोलक बसेस, रेल्वे आणि ट्रकमधून कोलंबोत दाखल झाले आहेत. देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. २ कोटी २० लाख लोकसंख्या असलेली श्रीलंका परकीय चलनाच्या तीव्र टंचाईशी झुंज देत आहे. येथे इंधन, अन्न आणि औषधांची आयात मर्यादित होत आहे. श्रीलंका गेल्या सात दशकांतील सर्वात वाईट आर्थिक संकटात बुडाली आहे.

शनिवारी आंदोलकांनी हातात काळे ध्वज आणि राष्ट्रध्वज घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रपतींच्या विरोधात त्यांनी "गोटा गो होम" (Gota go home) अशा घोषणा देत राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला. आंदोलक मोठ्या संख्येने उतरून आंदोलन करणार असल्याने श्रीलंकेतील अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत शुक्रवारी रात्री ९ पासून पुढील आदेशापर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. नेगोंबो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लाविनिया, कोलंबो उत्तर, कोलंबो दक्षिण आणि कोलंबो सेंट्रल भागात पोलिसांनी कर्फ्यू लागू केला आहे. जो कोणी कर्फ्यचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या श्रीलंकेमध्ये अराजक परिस्थिती आहे. अन्नधान्याची प्रचंड टंचाई, राक्षसी पातळीवर पोहोचलेली महागाई, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा यांसारख्या मूलभूत पातळीवरील समस्यांमुळे श्रीलंकेतील जनता सरकारविरोधात रस्त्यावर उतरून हिंसाचार माजवत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT