Latest

राज्य मंडळाकडून 13 कोटी प्रमाणपत्रांचे जतन; प्रमाणपत्रे डिजीलॉकरमध्ये सुरक्षित

अमृता चौगुले

गणेश खळदकर :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 1990 पासून 2023 पर्यंतची दहावी-बारावीची मुख्य आणि पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 13 कोटी विद्यार्थ्यांची गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे डिजीलॉकर या केंद्र सरकारच्या पोर्टलवर उपलब्ध करून जतन केली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित प्रमाणपत्रे ऑनलाइन उपलब्ध झाली आहेत. तर अन्य संस्थांना संबंधित प्रमाणपत्रांचे व्हेरिफिकेशन करता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंडळाने एनआयसीच्या माध्यमातून ई-मार्कशिट नावाचे पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर 1990 पासून गुणपत्रके तसेच प्रमाणपत्रांचा डाटा अपलोड करण्यात आलेला आहे. हे पोर्टल आता केंद्र सरकारच्या डिजीलॉकर या पोर्टलला इंटिग्रेट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोंदणी करून डिजीलॉकर या पोर्टलवर त्यांची प्रमाणपत्रे पाहता येत आहेत. मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सचे ई-सनद नावाचे एक पोर्टल आहे. या पोर्टललादेखील डिजीलॉकर या पोर्टलला इंटिग्रेट करण्यात आले आहे. त्यामुळे परदेशात जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत, त्यांची ऑनलाउन पडताळणी परदेशात संबंधित संस्थांना या पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना कोणतीही नोकरी तसेच विविध दाखल्यांसाठी दहावी-बारावीची प्रमाणपत्रे आवश्यकच असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हार्डकॉपी घेऊन जाण्यापेक्षा ऑनलाइन प्रमाणपत्राची प्रिंट काढणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही संस्थेला एखाद्या विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र बनावट आहे किंवा खरे आहे, याची पडताळणी करता येणार आहे. विशेष म्हणजे, राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे. त्यामुळे याचा विद्यार्थी तसेच अन्य संस्थांना मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट
झाले आहे.

बोगस प्रमाणपत्राला आळा
दहावी-बारावीची प्रमाणपत्रे अनेक ठिकाणी उपयोगाची असतात. त्यामुळे जे विद्यार्थी दहावी-बारावी नापास झालेले असतात, असे विद्यार्थी अनेकवेळा संबंधित प्रमाणपत्रे बनावट तयार करतात. परंतु, आता डिजीलॉकरवर प्रमाणपत्रे उपलब्ध असल्यामुळे आणि कोणत्याही संस्थेला ते प्रमाणपत्र पाहण्याची सोय उपलब्ध असल्यामुळे संस्थादेखील प्रमाणपत्रांची पडताळणी करीत आहेत. यातून दहावी-बारावीच्या बोगस प्रमाणपत्राला पूर्ण आळा बसल्याची माहिती राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी दिली आहे.

राज्य मंडळाने दहावी-बारावीची प्रमाणपत्रे डिजीलॉकरच्या माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध केली आहेत. यासाठी 2014 पासून काम सुरू होते. आतापर्यंत 13 कोटी प्रमाणपत्रांचे जतन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही शुल्काशिवाय डिजीलॉकरमध्ये त्यांची प्रमाणपत्रे पाहण्याची तसेच डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध आहे.
          – शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT