पुढारी ऑनलाईन डेस्क : नितीश कुमार यांनी महाआघाडी सरकारमधून बाहेर पडून एनडीएसोबत नवे सरकार स्थापन केल्याने बिहारच्या राजकारणात मोठी उलथापलथ झाली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल? बेगुसराय येथील जन सूरजचे नेते प्रशांत किशोर यांनी सोमवारी (दि. २९) या विषयावर आपली भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या पक्षांना या युतीची सर्वात मोठी किंमत चुकवावी लागेल असा अंदाज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला.
२०२० मध्ये भाजपचे ७५ आमदार आणि जेडीयूचे ४२ आमदार होते, त्यावेळी तुम्ही भाजपच्या वतीने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री का केले नाही आणि बिहारच्या विकासाची जबाबदारी का घेतली नाही असे प्रश्न प्रशांत किशोर यांनी उपस्थित केले.
प्रशांत किशोर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मी यापूर्वीच सांगितले आहे की, नितीश कुमार महाआघाडीत लढले असते तर त्यांना 5 जागाही मिळाल्या नसत्या. हे सांगताना त्यांच्या टीमचे लोक माझ्यावर टीका करायचे. पण कदाचित या भीतीपोटीच नितीश कुमार आज भाजपमध्ये दाखल झाले आहेत. महाआघाडीसोबतही आपले खाते उघडले जाणार नाही हे त्यांना माहीत होते. नव्या व्यवस्थेत एनडीए, मोदी आणि भाजपच्या नावावर त्यांना काही जागा नक्कीच मिळतील.
किशोर पुढे म्हणाले की, नितीश कुमार कधीही बाजू बदलू शकतात. हा त्यांच्या राजकारणाचा एक भाग झाला आहे. पण आजच्या घडामोडींमुळे बिहारमधील सर्व पक्ष आणि नेते 'पलटूमार' असल्याचे दिसून आले आहे. प्रशांत किशोर २०१८ मध्ये जेडीयुमध्ये काही काळ सामील झाले होते आणि त्यांना पक्षाच्या उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली होती. त्यावेळी, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा देण्याच्या जेडीयूच्या निर्णयावर टीका केल्यावर लगेचच त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
हेही वाचा