BJP Bihar Politics : नितीश कुमारांना पर्याय सम्राट चौधरी? ‘असे’ असेल भाजपचे नवे राजकारण | पुढारी

BJP Bihar Politics : नितीश कुमारांना पर्याय सम्राट चौधरी? ‘असे’ असेल भाजपचे नवे राजकारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : BJP Bihar Politics : बिहारमध्ये नितीशकुमार यांनी महाआघाडीला सोडचिठ्ठी देत पुन्हा एकदा भाजपच्या साथीने नवे सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये भाजपने सम्राट चौधरी आणि विजय सिंघा यांना उपमुख्यमंत्री केले आहे. चौधरी हे नितीश यांच्याप्रमाणे ओबीसी नेते आहेत. मात्र, ते नितीश (72) यांच्या तुलने तरुण आहेत, जे भाजपसाठी फायदेशीर ठरतील असे राजकीय तज्ञांचे मत आहे. त्यामुळे 55 वर्षीय चौधरींच्या माध्यमातून भाजप 2025 च्या बिहार निवडणुकीसाठी नेमकी कशी तयारी करत आहे याची चर्चा रंगली आहे.

कोण आहेत सम्राट चौधरी? (BJP Bihar Politics)

16 नोव्हेंबर 1968 रोजी जन्मलेले चौधरी सध्या बिहार विधान परिषदेचे सदस्य आहेत. चौधरी हे कुशवाह समाजातील बड्या नेत्यांपैकी एक शकुनी चौधरी यांचे पुत्र आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पासून सुरू केली. 1999 मध्ये ते राबडीदेवी सरकारमध्ये कृषी मंत्री होते. त्यांनी 2000 आणि 2010 मध्ये परबट्टा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. 2014 मध्ये ते जीतन राम मांझी यांच्या सरकारमध्ये आणि 2020 मध्ये नितीश सरकारमध्ये मंत्री होते.

भाजपमध्ये चौधरींचा दर्जा झपाट्याने वाढला

चौधरी यांनी 2017 मध्ये आरजेडीला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. 2018 मध्ये त्यांना भाजपने बिहारचे प्रदेश उपाध्यक्ष बनवले होते आणि आता त्यांच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागली आहे. त्यांच्या उपमुख्यमंत्रिपदावरून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्यांच्या रुपाने बिहारमधील भाजपच्या नव नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर दुसरीकडे नितीश यांच्यासोबत सामंजस्याने राज्य करणाऱ्या सुशील मोदींचा काळ संपला असून आता भाजपला नितीश यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे नाहीत. (BJP Bihar Politics)

चौधरी यांना उपमुख्यमंत्री करण्यामागचा राजकीय अर्थ काय?

2025 च्या विधानसभा निवडणुकीकडे भाजपचे बारीक लक्ष आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (कुर्मी) आणि उपमुख्यमंत्री चौधरी (कुशवाह) हे ओबीसी नेत आहेत. अशातच भाजपने चौधरींना महत्त्व देऊन राज्यातील लव (कुर्मी) आणि कुश (कुशवाह) ही व्होटबँक आपल्याकडे आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. राज्यात कुशवाहाची लोकसंख्या 4.27 टक्के आणि कुर्मी 2.87 टक्के आहे.

भाजप आता मोठ्या भावाच्या भूमिकेत (BJP Bihar Politics)

राजकीय मजबुरीमुळे नितीश यांनी अनेकवेळा भाजपसोबत युती केली. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांची व्होट बँक कमकुवत झाली आहे आणि आता भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे, हेही त्यांना माहीत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-जेडीयूने प्रत्येकी 17 जागा लढवल्या, परंतु भाजपने जास्त जागा जिंकल्या. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूला फक्त 43 जागा मिळाल्या, तर भाजपने 78 जागा जिंकल्या.

चौधरींच्या माध्यमातून भाजप जातीय समीकरण कसे सोडवणार?

मागासवर्गीय, ओबीसी आणि दलित व्होट बँक्सच्या माध्यमातून नितीश आतापर्यंत सत्तेत आहेत. ओबीसींना वाढीव आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी मोठी राजकीय खेळी खेळली. पण भाजपमधून चौधरी यांना मिळालेल्या बढतीमुळे नितीश यांच्या जातीय राजकारणाला चोख प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे. बिहारच्या जात सर्वेक्षणानुसार, राज्यात 63 टक्के ओबीसी (27 टक्के मागासवर्गीय + 36 टक्के अत्यंत मागासवर्गीय) आहेत. चौधरी यांच्या माध्यमातून भाजपची नजर या मतदारांवर आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजप नितीश यांना हटवणार?

सध्या भाजपचेच वर्चस्व आहे आणि नितीश ‘बॅकसीट’वर आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर नितीश मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतील असे वातावरण तयार केले जाऊ शकते. यात भाजपला यश आले तर 2025 च्या विधानसभा निवडणुकीसाठी चौधरी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपसूकच मैदान तयार होईल.

बिहारमध्ये तीन मागास जातींमध्ये स्पर्धा?

ऐतिहासिकदृष्ट्या 3 जातींनी बिहारमध्ये उच्च जातीविरोधी चळवळींचे नेतृत्व केले आहे. यात कुशवाह, कुर्मी आणि यादव या जातींचा समावेश आहे. चौधरी कुशवाहतून, नितीश कुर्मीतून आणि लालू प्रसाद यादव यादव समाजातून येतात. यादव आणि कुर्मींनी सत्तेची चव चाखली आहे, तर कुशवाह नेहमीच त्यापासून दूर राहिले आहेत. त्यामुळे चौधरींच्या माध्यमातून सत्तेचा हा दुष्काळ संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Back to top button