पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir Pran Pratishtha) समारंभाला उपस्थित राहिलेले मुस्लिम धर्मगुरू (इमाम) डॉ. उमर अहमद इलियासी यांच्या विरोधात फतवा काढण्यात आला आहे. मुफ्ति साबीर हुसेन यांनी हा फतवा काढला असून या फतव्यात इलियासी यांच्याविरोधात इतर धर्मगुरुंनी कारवाई करावी, असे म्हटले आहे. दरम्यान इलियासी यांना जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत.
इलियासी ऑल इंडिया इमाम संघटनेचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, 'हा फतवा रविवारी काढण्यात आला आहे. पण मला जीवे मारण्याच्या धमक्या 22 जानेवारीपासूनच येत आहेत. जे माझ्यावर प्रेम करतात, ते देशावरही प्रेम करतात. राम मंदिर सोहळ्याला उपस्थित होतो, म्हणून माझा द्वेष करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे. मी प्रेमाचा संदेश दिला आहे आणि कोणताही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.'
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला जाण्याबद्दलचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला, हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा निर्णय होता. मंदिर ट्रस्ट आणि तेथील संतांनी माझे स्वागत केले. माझा उद्देश प्रेमाचा संदेश देणे हा होता, असे ते म्हणाले आहेत.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर मला त्रास दिला जात आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय परमेश्वर आणि मी या दोघांतील आहे, मी कोणाचीही माफी मागण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, असे ते म्हणाले आहेत.