Latest

Minister Hasan Mushrif : सत्ता मिरवण्यासाठी नव्हे विकासासाठी हवी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

Arun Patil

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा : गडहिंग्लज शहरात सत्ता नसतानाही आजपर्यंत 128 कोटींची विकासकामे केली. आता शहरातील विरोधातील अनेक प्रमुख लोक राष्ट्रवादीत आले आहेत. सत्ता मिरवायची नसून, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सत्ता हवी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लज शहरातील 13 कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी तसेच पाटील बंधूंच्या वाढदिवसप्रसंगी आयोजित कार्यक्रमात शनिवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी किरण कदम होते. (Minister Hasan Mushrif)

रामगोंडा पाटील यांनी प्रास्ताविक केेले. ते म्हणाले, आम्ही मुश्रीफ एके मुश्रीफ असून, कार्यकर्त्यांना बळ देणारा हा एकमेव नेता असल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी हारुण सय्यद, किरण कदम, सिद्धार्थ बन्ने, मनसेचे नागेश चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. नरेंद्र भद्रापूर यांनी आजवर शहरात कुणाची जरी सत्ता असली, तरी मुश्रीफ यांनीच निधी दिल्याने विकासकामे झाल्याचे सांगितले. मुश्रीफ म्हणाले, संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. राजकारणात तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. माझ्या राजकीय आयुष्यात देखील फार मोठा संघर्ष वाट्याला आला असून, कोल्हापूरच्या विकासाचे स्वप्न आता पूर्ण करण्याची संधी मिळाल्याने ते पूर्ण करू. (Minister Hasan Mushrif)

यावेळी रामगोंडा पाटील, शिवराज पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रा. किसनराव कुराडे, डॉ. नागेश पट्टणशेट्टी, रमेश रिंगणे, उदय जोशी, बसवराज खणगावे, उदय पाटील यांच्यासह शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश सलवादे यांनी आभार मानले.

सामानगडावर शिवरायांचा पुतळा

गडहिंग्लज शहरालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ले सामानगडावर ना. मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून छ. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी केली. यावर मुश्रीफ यांनी हा पुतळा उभारण्याची जबाबदारी आपण घेत असून, पूर्णाकृती भव्य दिव्य असा शिवरायांचा पुतळा उभारू, अशी ग्वाही दिली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT