Latest

कर्नाटक, महाराष्ट्रमध्ये ताळमेळ नसल्याने कोल्हापुरात पुन्हा पुराची शक्यता : विजय कुमार दिवाण

अमृता चौगुले

सांगली (विटा), पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या सिंचन विभागात ताळमेळ नसल्याने कोल्हापूर शहरात पुन्हा पुराची शक्यता असल्याचा इशारा सांगलीच्या कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीचे समन्वयक निवृत्त अभियंता विजय कुमार दिवाण यांनी दिला आहे.

निवृत्त अभियंता दिवाण म्हणाले, अलीकडच्या काळात कृष्णा नदीला वारंवार महापुराची परिस्थिती का निर्माण होत आहे? याला भौगोलिक कारणांबरोबरच मानवी चुका कारणीभूत ठरत आहेत. विशेषतः त्यातही महाराष्ट्र आणि कर्नाट क या दोन्ही राज्यांच्या जलसंपदा अर्थात सिंचन किंवा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय नसल्यानेच प्रत्येक वर्षी सांगलीच्या कृष्णेला आणि कोल्हापूरच्या पंचगंगा नदीला पुराची स्थिती निर्माण होत आहे. पंचगंगा नदी ही कृष्णा नदीची या परिसरातील सर्वात मोठी उपनदी आहे. साहजिकच कृष्णा नदीबरोबर पंचगंगेच्याही पाणलोटचा अभ्यास गेल्या तीन वर्षांपासून आम्ही कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीमार्फत करीत आहोत. यात एक गोष्ट आम्हाला स्पष्ट दिसत आहे की, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे हे बंधनकारक आहे. मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही विशेषता कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाच्या बाबत केंद्रीय जलायोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांना आणि सूचनांना पाळत नसल्याचे वारंवार दिसत आहे.

परिणामी कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आज रोजी ३१ जुलै अखेरीस कर्नाटकचे अलमट्टी आणि महाराष्ट्राचे कोयना या दोन्ही धरणांचे व्यवस्थापन करणारे अधिकारी केंद्रीय जल आयोगाच्या धरण परिचालन मार्गदर्शक सूचनांचे पालन करताना दिसून येत नाहीत. आज अलमट्टी धरण ८३ टक्के व कोयना ७५ टक्के भरलेले आहे. वास्तविक हे दोन्ही धरणे ३१ जुलै अखेर केवळ ५० टक्केच भरणे अपेक्षित आहे. त्यातच तिकडे कर्नाटकात अलमट्टीची आजची पाणी पातळी ५१८.३१ मीटर एवढी झाली आहे.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पंचगंगेची पुराची पातळी वाढत असताना गेल्या आठवड्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारचे धरण व्यवस्थापन अतिशय चांगले असून योग्य समन्वयाने काम सुरू असल्याचे सांगत येत्या १५ ऑगस्टपर्यंत कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची पाणी पातळी ही ५१७ मीटर इतकी कायम ठेवतील, यावर महाराष्ट्रातील सिंचन विभाग लक्ष ठेऊन आहे असे म्हटले होते.

परंतु आजच एकूण १२३ टीएमसीच्या अलमट्टी धरणाची पाणी पातळी ५१८.३१ मीटरवर (एकूण पाणीसाठा १०२.२६२ टीएमसी म्हणजे ८३%च्या वर ) गेली आहे. गेल्या २४ तासांत या धरणात पाण्याची आवक (येवा) १ लाख ३६ हजार ९८६ क्यूसेक्स आहे तर जावक अर्थात विसर्ग ५९ हजार २५० क्यूसेक्स इतका आहे. तसेच कृष्णेतून ५७ हजार क्यूसेक्स पाणी सतत पुढे वाहत आहे.

हवामान अंदाजानुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणखी जोरदार पावसाचा अंदाज आहे. हे लक्षात घेता अलमट्टी धरणातून तातडीने विसर्ग वाढवला पाहिजे अन्यथा कोल्हापूर पुन्हा पूरात जाण्याची शक्यता निर्माण होणार आहे, असेही दिवाणी यांनी सांगितले आहे.

-हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT