Latest

Pollution in mumbai: मुंबई शहराला प्रदूषणाचा विळखा कायम; शेकोटीवर पालिकेची बंदी

मोनिका क्षीरसागर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा…हे पारंपरिक गाणे मुंबईकरांना विसरावे लागणार आहे. थंडीपासून थोडी उब मिळावी यासाठी ठिकठिकाणी विशेषतः झोपडपट्टी व बेघर असलेल्या नागरिकांकडून पेटवण्यात येणाऱ्या शेकोटीला बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. (Pollution in mumbai)

मुंबईत थंडीची चाहूल लागली आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोटी पेटवल्यास त्यातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषणात वाढ होईल, असे पर्यावरण तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने शेकोटीलाच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शेकोटी पेटवणाऱ्या नागरिकांवर पालिकेची नजर राहणार असून पालिकेच्या विभाग कार्यालयांना सतर्क राहण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. (Pollution in mumbai)

Pollution in mumbai: समज, नोटीस, थेट दंड

शेकोटी पेटवणाऱ्याला पहिल्यांदा समज देण्यात येईल. त्यानंतरही त्याने शेकोटी पेटवल्यास नोटीस बजावण्यात येईल. तिसऱ्यांदा शेकोटी पेटवल्याचे दिसल्यास थेट दंडात्मक कारवाई होईल. त्यानंतरही शेकोटी पेटवल्यास पोलिसात तक्रार करण्यात येईल.

मुंबईला प्रदूषणाचा विळखा कायम; पालिका अॅक्शन मोडवर

हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) दीडशेपार राहिल्याने मुंबईला हवा प्रदूषणाचा विळखा कायम आहे. शुक्रवारी शहरातील हवा खराब श्रेणीमध्ये होती. वरळीमध्ये सर्वाधिक १६८ एक्यूआय होता. दुसऱ्या क्रमांकावर याच परिसरातील सिद्धार्थ नगर आहे. सायन, मालाड, कुलाबा आणि देवनार परिसरातील एक्यूआयची नोंद १६१-१६८ दरम्यान नोंदली गेली.

हवेची गुणवत्ता किंचित सुधारण्याचा अंदाज आहे. तरीही संवेदनशील वर्गातील लोकांच्या आरोग्यासाठी सध्याची हवा घातक करणारी आहे. हिवाळ्यास अजून अवकाश असतानाही पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील काही भागात आधीच हवेची गुणवत्ता मध्यम ते खराब दर्शविण्यास सुरुवात झाल्याचे 'सफर'ने (सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) म्हटले आहे. वाढते प्रदूषण पाहता मुंबईकरांनी घराबाहेर जास्त श्रम करणे टाळावे. मास्क घालावे आणि घरात एअर प्युरिफायर चालवावे, असा सल्ला आयक्यूएअरने दिला आहे.

क्रेडाईचा दावा

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी सक्तीची नियमावली जाहीर केली. यात विकासकांसाठी कडक निर्बंध लावले. मात्र, शहरातील प्रदूषणाला केवळ बांधकामे जबाबदार ठरवणे अवैज्ञानिक असल्याचा दावा 'क्रेडाई'ने केला आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प, अनियंत्रित कचरा विल्हेवाट, औद्योगिक उत्सर्जन व अवजड वाहनांची वाहतूक या साऱ्यांमुळेही प्रदूषण पातळी वाढत आहे. वीज प्रकल्प, रिफायनरी व देवनार लैंडफिल यासारखे घटक हवेच्या गुणवत्तेवर परिणाम करीत असल्याचे क्रेडाईने म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT