Latest

चौंडीच्या अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमाला पवार आजोबा- नातूकडून राजकिय स्वरुप: पडळकर

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा

चौंडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव अराजकिय स्वरुपात साजरा होत असतो. परंतु पवार आजोबा- नातूनी त्याला राजकिय स्वरुप दिले असल्याची टीका भाजपचे विधानपरिषदेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.  जागर अहिल्या युगाचा जागर पराक्रमी यात्रेचा कार्यक्रमांर्तगत रविवारी रात्री पडळकर बारामतीत आले होते. यावेळी बोलताना त्यांनी पवारांवर जोरदार हल्ला चढवला.

सरदार सुभानजी देवकाते यांच्या समाधीस्थळाची बारामतीतील कन्हेरी येथे पवारांकडून छेडछाड होत असल्याचा आरोप केला. शिवराज्याभिषेक दिनी जे मोजके सरदार उपस्थित होते, त्यात देवकाते यांचा समावेश होता. निष्ठा निभावणे हे त्यांच्या रुपाने स्वराज्याने पाहिले होते. छत्रपती राजाराम महाराजांवर संघर्षाची वेळ आली त्यावेळी सुभानजी अग्रस्थानी होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत ते जंजीरा मोहिमेत होते.

त्यांना इनामकीपोटी ४५३ गावांची इनामकी मिळाली होती. त्यात बारामती तालुक्यातील काटेवाडीसह आजूबाजूच्या गावचा समावेश होता. काटेवाडी मूळची देवकातेंची आहे. परंतु पवारांनी इथे अनेक गोष्टीत अतिक्रमण केले आहे. बहुजनांच्या इतिहासाचे लचके तोडण्याचे काम ते करत आहेत. ज्ञानवापी मशिदीचा विषय सध्या देशभर गाजतो आहे. परंतु इथे कन्हेरीत सुभानजी देवकाते यांच्या समाधीस्थळाच्या बाबतीत हाच प्रकार घडतो आहे.

बाजूलाच शिवसृष्टी उभी राहत असताना सुभेदाराच्या समाधीस्थळावर अन्याय केला जात आहे. शासनाने येथे त्यांचे उचित स्मारक उभे करावे, जीवनपट उलगडेल अशी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली. पडळकर म्हणाले, ज्या दाऊद इब्राहीमने मुंबईत बॉंबस्फोट केला. त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. त्याची बहिण हसीना पारकर हिच्यासोबत नवाब मलिक यांनी आर्थिक व्यवहार केले. अशा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या, दाऊदचे पैसे वापरणाऱ्या, ज्यांच्या पैशाला हिंदूचे रक्त लागले आहे.

अशा लोकांच्या पैशाचा गैरवापर ते अहिल्यादेवी जयंतीनिमित्त करत आहेत. असा आरोप पडळकर यांनी केला. अहिल्यादेवींचे काम अखन्ड हिंदूस्थानात आहे. त्यांनी देवासाठी, धर्माच्या रक्षणासाठी काम केले. जेव्हा जेव्हा या देशात हिंदू संस्कृतीवर मुघल व अन्य लोकांकडून अतिक्रमण झाले, हिंदू मंदिरे पाडली गेली, अशावेळी अहिल्यादेवीनी मंदिराचा जिर्णोध्दार केला. सरदार मल्हारराव होळकर हे ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी २० हजारांची फौज घेवून काशीमध्ये दाखल झाले होते.

अहिल्यादेवींच्या विचारसरणीच्या उलट काम पवार कुटुंबियांचे आहे. त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी आणि जयंती कार्यक्रमात राजकारण करु नये. चौंडी हे तमाम समाज बांधवांचे उर्जास्थान आहे. आमच्या उर्जास्थानावर जर तुम्ही राजकारण करण्याच्या भानगडीत पडला तर याद राखा असा इशारा दिला. आम्ही हिंदू आहोत हे त्यांना सांगावे लागते, मंदिरात नारळ फोडून त्याच्या बातम्या छापून आणाव्या लागतात. हे म्हणजे लबाड लांडग ढोंग करतय… हिंदू असल्याचे सोंग करतेय.. या शब्दात त्यांनी पवारांवर निशाणा साधला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT