Latest

मुंबई : रस्त्यांच्या कडेला सोडून दिलेली ७८२ बेवारस वाहने जप्त

अनुराधा कोरवी

मुंबई: पुढारी वृत्तसेवा: मुंबई महानगर क्षेत्रात रस्त्यांच्या कडेला बेवारस अवस्थेत सोडून दिलेली आणि पर्यायाने वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उचलून नेण्याची कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाने धडाक्यात सुरु केली आहे. मागील आठवडाभरात एकूण २ हजार ३८१ वाहनधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली. त्यानंतर ३७९ जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने प्रशासनाने जप्त केली आहेत.

कोविड विषाणू संसर्ग कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे नागरी सेवा-सुविधांशी संबंधित दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त कोविड व्यवस्थापनाचे अतिरिक्त कामकाज असल्याने उपलब्ध मनुष्य बळावर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे कोविड कालावधीत रस्त्यांच्या कडेला असलेल्या बेवारस वाहनांवरील कारवाई करण्याचे कामकाज महानगरपालिकेकडून वाहतूक पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.

सद्यस्थितीत, कोविड परिस्थिती नियंत्रणात येऊन जनजीवन पूर्वपदावर आले असताना आणि वाहतूक सर्वसामान्यपणे सुरु असताना बेवारस वाहनांसंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने, त्या संदर्भात कारवाई करण्याबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. त्यात उपआयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) श्रीमती चंदा जाधव यांच्यासह सर्व परिमंडळांचे उपआयुक्त, सर्व २४ विभागांचे सहायक आयुक्त, पोलीस उपआयुक्त (वाहतूक), सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक), वरिष्ठ पोलीस निरिक्षक (वाहतूक) यांच्यासह इतर संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

मुंबई महानगरात रस्त्यांच्या कडेला व इतरत्र बेवारस अवस्थेत सोडून दिलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी कारवाई करणे, सदर कारवाईसाठी समन्वय साधणे तसेच या कामकाजामध्ये उद्भवत असलेल्या अडीअडचणी इत्यादी मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने उचलून नेलेली बेवारस वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पोलीस प्रशासनाला कारवाईवर मर्यादा येत असल्याचे सांगण्यात आले.

बेवारस वाहने उचलून नेण्याबाबतची कार्यवाही वाहतूक पोलिसांनी पूर्वीप्रमाणेच महानगरपालिका प्रशासनाकडे सोपवावी. त्यासाठी पोलिसांकडे असलेली टोईंग वाहने महानगरपालिकेकडे सुपूर्द करावीत. कोविडपूर्व कार्यपद्धतीनुसार महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयानी बेवारस वाहनांवर कार्यवाही करावी. त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करावी. उपआयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) व सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांचे आवश्यक ते पालन करावे, असे निर्देश डॉ. संजीव कुमार यांनी या बैठकीत दिले.

बेवारस अवस्थेत उचलून आणलेली वाहने ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या बहुतांश जागांची क्षमता संपुष्टात आली आहे. उपआयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) श्रीमती चंदा जाधव यांनी ही बाब लक्षात आणून देत वाहतूक पोलीस आणि इतर संबंधित शासकीय परवानगी तातडीने प्राप्त करुन सदर वाहनांचा लिलाव करावा लागेल. जेणेकरुन, नव्याने येणाऱ्या बेवारस वाहनांसाठी जागा उपलब्ध होऊ शकेल. असे म्हटले आहे. तसेच सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागात उपलब्ध जागा, तेथे सद्यस्थितीत असलेली वाहने या अनुषंगाने माहिती पाठविण्याचे आवाहन देखील उपआयुक्त श्रीमती जाधव यांनी यावेळी केले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले की, सर्व सहायक आयुक्तांनी यापूर्वीच्या बेवारस वाहनांचा लवकरात- लवकर लिलाव होण्यासाठी १५ दिवसांच्या आत आवश्यक त्या सर्व परवानगी प्राप्त करून घ्याव्यात व नियमानुसार लिलावाची कार्यवाही पूर्ण करावी. याबाबतचा नियमित आढावा संबंधित परिमंडळांसह आयुक्त आणि उपआयुक्त यांनी घ्यावा. असे सांगितले.

या बैठकीनंतर उपआयुक्त श्रीमती चंदा जाधव यांच्या देखरेखीखाली ही कारवाई सुरू करण्यात आली. महानगरपालिका प्रशासनाने आठवडाभरात सर्व २४ प्रशासकीय विभाग मिळून आतापर्यंत २ हजार ३८१ वाहनधारकांना नोटीस बजावली आहे. पैकी ३७९ वाहनधारकांनी आपली वाहने स्वतःहून हटवली आहेत. तर ३१४ दुचाकी, २८६ तीनचाकी आणि १८२ चारचाकी अशी एकूण ७८२ वाहने  महानगरपालिका प्रशासनाने जप्त केली आहेत. ( ७८२ बेवारस वाहने जप्त )

विहित मुदतीतमध्ये प्रतिसाद न मिळाल्यास जप्त केलेल्या बेवारस वाहनांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच लिलाव केला जाणार आहे. नागरिकांनी रस्त्यांच्या कडेला बेवारस अवस्थेत वाहने सोडू नयेत आणि ज्यांची वाहने जप्त केली आहेत त्यांनी नोटीसमधील सुचनेनुसार प्रक्रिया पूर्ण करून, आवश्यक दंड भरून वाहने घेवून जावीत, असे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT