Latest

Maratha reservation protest jalna: मुंबईहून आदेश आल्यानंतर पोलिसांचा लाठीचार्ज : शरद पवारांचा आरोप

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईहून आदेश आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना दोष देणार नाही. परंतु ज्यांनी कुणी आदेश दिला, हे पाहणे आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे, मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही, असे स्पष्ट करत जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. त्यामुळे मराठा आंदोलन शांततेने चालू ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि.२) पत्रकार परिषदेत केले. जालना जिह्यातील अंतरवली सराटी येथील आंदोलनस्थळी पवार यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Maratha reservation protest jalna)

पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी जालन्याच्या बाहेरून तरूण आले होते. मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांशी चर्चा चालू असताना पोलिस मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नव्हता, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे लाठीचार्जची घटना गंभीर बाब आहे. राज्य सरकारकडून आंदोलकांना चुकीची वागणूक देण्यात आली, स्त्री, पुरूष न पाहता आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला, असा आरोप पवार यांनी यावेळी केला. (Maratha reservation protest jalna)

पवार पुढे म्हणाले की, जाळपोळ करून आंदोलन बदनाम करु नका, कायदा हातात घेण्याचे काम कुणी करु नये, शांततेत आंदोलन पुढे चालू ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात योग्य मार्ग काढण्यासाठी लक्ष घालून तोडगा काढावा. राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. आंदोलनप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली. आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या घटनेसाठी मी पोलिसांना दोष देणार नाही, परंतु त्यांना कुणी आदेश दिला. याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, दुर्दैवाने तो निर्णय कोर्टात टिकला नाही. इतर प्रवर्गाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ५० टक्केची अट काढावी लागेल. आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT