Latest

Israel-Hamas War News | इस्रायल-हमास युद्धात नागरिकांच्या मृत्यूचा तीव्र निषेध, संवादाने संघर्ष निवळू शकतो- पीएम मोदी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल-हमास युद्धादरम्यान होत असलेल्या नागरिकांच्या मृत्यूंबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या संघर्षामुळे पश्चिम आशियातील वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी 'ग्लोबल साउथ' (Global South) मध्ये एकजूट आणि सहकार्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. (Israel-Hamas War News)

संबंधित बातम्या 

दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिटच्या (2nd Voice of Global South Summit) उद्घाटन सत्रात बोलताना, पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलवर ९ ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्यांसह हिंसा आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या ठाम भूमिकेचाही उल्लेख केला. हा संघर्ष निवळण्यासाठी संयम बाळगण्याचे आणि संवादाला प्राधान्य देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

"आम्ही सर्वजण पाहत आहोत की पश्चिम आशिया क्षेत्रातील घटनांमधून नवीन आव्हाने उभी राहत आहेत. भारताने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला," असे पंतप्रधान मोदी म्हणाले. "आपल्याला संयम ठेवायला आहे. आम्ही संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर दिला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात नागरिकांच्या मृत्यूचाही आम्ही तीव्र निषेध करतो." असे त्यांनी नमूद केले.

पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदतही पाठवली आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा ग्लोबल साउथमधील देशांनी जागतिक हितासाठी एकत्र यायला हवे. (Israel-Hamas War News)

७ ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केल्यानंतर १,२०० हून अधिक इस्रायली नागरिक ठार झाले. त्याला चोख प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हमासचा गड असलेल्या गाझा पट्टीवर हवाई हल्ले केले. ज्यात आतापर्यंत ११ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी लोक ठार झाले आहेत.

ग्लोबल साउथ म्हणजे काय?

ग्लोबल साउथमध्ये विकसित देशांचा समावेश आहे, जे प्रामुख्याने आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील दक्षिण गोलार्धात वसलेले आहेत. ज्यामध्ये आर्थिक विकासाचे विविध स्तर आहेत. ग्लोबल साउथ जगाच्या लोकसंख्येच्या ८५ टक्क्यांहून अधिक आणि जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) सुमारे ४० टक्के प्रतिनिधित्व करते. विकसनशील देशांना भेडसावणाऱ्या चिंता, हितसंबंध आणि प्राधान्यक्रम यावर चर्चा करणे आणि विचार आणि उपायांची देवाणघेवाण करणे हा ग्लोबल साउथचा उद्देश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT