Israel-Hamas War : १६ वर्षांनंतर हमासने गाझा पट्टीवरील नियंत्रण गमावले; इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा | पुढारी

Israel-Hamas War : १६ वर्षांनंतर हमासने गाझा पट्टीवरील नियंत्रण गमावले; इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यात एक महिन्याहून अधिक काळ युद्ध सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत ११ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हमासने १६ वर्षानंतर गाझा पट्टीवरील नियंत्रण गमावले आहे. दहशतवादी पळून जात आहेत. पॅलेस्टिनी नागरिक हमासच्या तळांना लुटत आहेत. नागरिकांचा आता सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी सोमवारी एका व्हिडिओमधून केला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी कॅराकल बटालियनच्या सैनिकांशी संवाद साधला. यावेळी नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, ‘हे युद्ध केवळ ऑपरेशन नसून हमासचा नायनाट करण्याचा प्रयत्न आहे. हे ऑपरेशन नाही, हे युद्ध आहे, जे शेवटपर्यंत सुरू राहणार आहे. कारण जर आपण त्यांना आता संपवले नाही तर ते पुन्हा येतील.’ परदेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयडीएफच्या गोलानी ब्रिगेडच्या सैनिकांनी गाझा येथील संसद भवनावरही ताबा मिळवला आहे.

गाझातील ११,२४० लोकांचा बळी

गाझामधील या संघर्षात आतापर्यंत ११,२४० लोकांचा बळी गेला आहे. ज्यात ४,६३० मुलांचा समावेश आहे. इस्रायलच्या लष्करी मोहिमेमुळे गाझातील दोन तृतीयांश लोकसंख्या बेघर झाली आहे. इस्रायलने गाझाच्या उत्तरेकडील अर्धा भाग पूर्णपणे रिकामा करण्याचे आदेश दिले होते. तसेच नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले होते.

हॉस्पिटलमध्ये हमासचा तळ, आयडीएफने दिले पुरावे

आयडीएफचे प्रवक्ते रीड अॅडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की, हमास इस्रायली ओलिसांना हॉस्पिटलच्या तळघरात ठेवत असल्याचे पुरावे आहेत. इस्रायली नौदल आणि इतर सैन्याच्या १३ कमांडो तुकड्यांनी गाझा येथील रेंटीसी हॉस्पिटलवर छापा टाकला. हॉस्पिटलच्या खाली असलेल्या तळघरात हमासचे कमांड अँड कंट्रोल सेंटर, आत्मघाती बॉम्ब वेस्ट, ग्रेनेड, एके-४७, असॉल्ट रायफल, स्फोटक उपकरणे, आरपीजी आणि इतर शस्त्रे, संगणक आणि पैसे जप्त केले. येथे ओलीस ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या तळघराची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे युद्ध हमासविरुद्ध आणि दहशतवाद्यांविरुद्ध आहे. दहशतवादी नागरिकांचा ढाल म्हणून वापर करतात, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button