कराचीत चिनी युद्धनौका, पाणबुडी | पुढारी

कराचीत चिनी युद्धनौका, पाणबुडी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हिंदी महासागरावर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी हरतर्‍हेचे प्रयत्न करणार्‍या चीनने आता युद्ध सरावाच्या नावाखाली अरबी समुद्रात पाकिस्तानच्या मदतीने पाय पसरायला सुरुवात केली आहे. चीनच्या तीन युद्धनौका आणि एक पाणबुडी दाखल झाली आहे. या तीन युद्धनौकांत एक विनाशिका व दोन हलकी लढाऊ जहाजे आहेत. आपले सागरी सामर्थ्य दाखवत भारतावर दबाव निर्माण करण्याचा हा चीनचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.

पाकिस्तान आणि चीन प्रथमच संयुक्त नौदल सराव करणार आहेत. अरबी समुद्रात होणारा हा नौदल सराव प्रत्यक्षात भारताच्या पश्चिम किनार्‍यावर आपली ताकद दाखवण्याचाच एक प्रकार असून, भारत त्या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. या सरावाच्या निमित्ताने चीनने आपल्या तीन युद्धनौका कराची बंदरात नांगरल्या आहेत. या नौकांची उपग्रह छायाचित्रे मॅक्सार संस्थेने जारी केली असून, त्यात या युद्धनौका स्पष्ट दिसत आहेत. या नौकांमध्ये दोन टाईप 054 एपी जातीच्या हलक्या युद्धनौका व एक टाईप 52 जातीची विनाशिका यांचा समावेश आहे. याशिवाय चीनची टाईप 039 जातीची डिझेल व इलेक्ट्रिकवर चालणारी पाणबुडीही कराची बंदरात दाखल झाली आहे.

काय आहेत या युद्धनौका?

054 एपी जातीच्या हलक्या युद्धनौका या वेगवान मानल्या जातात. त्यावर मशिनगन, छोट्या तोफांसह मारा करण्याची सारी शस्त्रसामग्री आहे. याशिवाय संदेेशवहनाची अत्याधुनिक सुविधा आहे. टाईप 52 जातीची विनाशिका ही नावाप्रमाणेच घातक शस्त्रास्त्रे, टोर्पेडो व सागरी तोफांनी सज्ज असलेले मोठ्या आकाराचे लढाऊ जहाज आहे. आतापर्यंत चीनच्या या युद्धनौका दक्षिण चिनी समुद्रात तसेच हिंदी महासागरात तैनात केल्या जात. आता त्या प्रथमच भारताच्या पश्चिम सागरी सीमेवर दाखल झाल्या आहेत. चीनची टाईप 039 पाणबुडी ही सर्वात कमी आवाज करणारी पाणबुडी आहे.

भारतावरच निशाणा

चीनने दक्षिण चिनी समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी हिंदी महासागर आणि आखातात मात्र त्यांना वर्चस्व स्थापित करण्यात अडचणी आहेत; तरीही चीनने जिबुती या आफ्रिकी देेशात आपला नौदल तळ उभारून अमेरिकेला आव्हान दिले आहे. शिवाय, भारतावर नजर रोखत ‘ड्रॅगन’ने श्रीलंकेच्या बंदरांत वेळोवेळी हेरगिरी नौका व युद्धनौका तैनात केल्या आहेत; पण भारताच्या पश्चिम किनार्‍यावर येण्याची आगळीक चीनने केलेली नव्हती. ती संधी या नौदल सरावाच्या माध्यमातून चीन साधू पाहत आहे. चीनच्या आण्विक पाणबुड्यांनी याआधी हिंदी महासागरात गस्त घातल्याची माहिती जगासमोर आलेली आहेच.

पाकची पाणबुड्यांची खरेदी

चीन भारताविरोधात आघाडी मजबूत करण्यासाठी पाकिस्तानला सर्वतोपरी मदत करीत असून, त्यात चीनच्या टाईप 054 जातीच्या जहाजांची व पाणबुड्यांची पाकिस्तानला विक्री करण्याचा करार काही महिन्यांपूर्वीच झाला आहे.

Back to top button