Latest

PM Modi US visit | पीएम मोदी अमेरिका दौऱ्यात एलन मस्क यांना भेटणार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. पंतप्रधान मोदी २० जून रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री उशिरा १.३० वाजता वॉशिंग्टनमधील अँड्र्यूज हवाई तळावर उतरतील. तेथे त्यांचे भारतीय- अमेरिकी समुदायाकडून स्वागत केले जाणार आहे. यानंतर बुधवारी त्यांच्या उपस्थितीत संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळा होईल. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. (PM Modi US visit)

दरम्यान, अमेरिकेतील न्यूयॉर्क दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्वान, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अन्य मिळून महत्त्वाच्या सुमारे २४ लोकांना भेटणार आहे.

पंतप्रधान मोदी टेस्लाचे सह-संस्थापक एलन मस्क (Tesla co-founder Elon Musk), खगोलभौतिकशास्त्रज्ञ नील डीग्रासे टायसन, ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय-अमेरिकन गायक फालू (फाल्गुनी शहा), पॉल रोमर, निकोलस नसीम तालेब, रे डालियो, जेफ स्मिथ, मायकेल फ्रॉमन डॅनियल रसेल, एल्ब्रिज कोल्बी, डॉ. पीटर आग्रे, डॉ. स्टीफन क्लास्को आणि चंद्रिका टंडन यांची भेट घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारपासून सुरू होणारा अमेरिका व इजिप्त दौरा सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. अमेरिका दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत दोन देशांत अनेक महत्त्वपूर्ण आणि संरक्षणविषयक करार होण्याची शक्यता आहे. त्यात जेट इंजिन निर्मितीपासून ड्रोन खरेदीपर्यंतच्या करारांचा समावेश आहे. याशिवाय त्यांचे अमेरिकी संसदेच्या संयुक्त सभागृहात भाषण होणार आहे. पंतप्रधानांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले असून अमेरिकेतील भारतीयांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

भारताचे परराष्ट्र सचिव विनयमोहन क्वात्रा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यातून दोन देशांतील संरक्षण उद्योगातील सहकार्याचा रोडमॅप निश्चित केला जाईल. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या चर्चेत संरक्षण उत्पादनातील सहउत्पादन आणि सहविकास या दोन बाबींवर सखोल चर्चा होणार आहे. त्यातून संरक्षण उद्योगाला बळ मिळणार आहे. तसेच मजबूत व्यापार आणि गुंतवणूक सहभागिता हा विषय दोन नेत्यांच्या चर्चेत असणार आहे. (PM Modi US visit)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी होऊन योगाभ्यासातही सहभागी होणार आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT