Latest

सावधान! ‘जॉब टास्क फ्रॉड’ करू शकतो कंगाल! सायबर चोरट्यांचा 53 जणांना 3 कोटी 80 लाखांचा गंडा

अमृता चौगुले

अशोक मोराळे

पुणे: समाजमाध्यमांद्वारे जर कोणी तुमच्याशी संपर्क साधून यू-ट्युब, इंस्टाग्राम किंवा अन्य कोणत्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर फॉलो करून चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगून, पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवून पैसे कमवा, असा जॉब टास्क देत असेल तर जरा सावधान..! कारण तो सायबर चोरट्यांनी तुम्हाला आर्थिक गंडा घालण्यासाठी लावलेला सापळा ठरू शकतो.

मागील तीन-चार महिन्यांत शेकडो पुणेकरांना सायबर चोरट्यांनी अशाप्रकारे कोट्यवधींचा गंडा घातला आहे. एकट्या सायबर पोलिसांकडे नोंद असलेल्या 53 तक्रारीत 3 कोटी 28 लाख 80 हजार रुपयांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यापैकी 9 गुन्हे दाखल आहेत. पोलिस ठाण्यांकडे दाखल असलेल्या तक्रारींचा व दाखल गुन्ह्यांचा आकडा वेगळा आहे, त्यामुळे जॉब टास्क फ्रॉडचा विळखा वाढतो आहे.

जेव्हा फसवणूक झालेली लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. पूर्वी लोन फ्रॉड, सेक्सटॉर्शन,ओएलएक्स, नोकरी, मेट्रोमोनियल, व्यावसायिक, हर्बल ऑईल अशा फ्रॉडद्वारे हे चोरटे नागरिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला मारत होते. आता ही टास्क फ्रॉडची नवी पद्धती शोधून गंडा घालण्यास सुरुवात केली आहे.

आयटीयन्सची सर्वाधिक फसवणूक

गेल्या काही दिवसांतील या फसवणुकींच्या घटनांचा आढावा घेतला तर आयटी क्षेत्राशी निगडित काम करणारे तरुण-तरुणींची सर्वाधिक फसवणूक झाल्याचे सायबर पोलिस सांगतात. पार्टटाईम जॉब टास्क फ्रॉडच्या बहाण्याने त्यांची ही फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक झालेली रक्कमदेखील एक लाखापासून दहा ते पंधरा लाखांच्या घरात आहे. आयटीमध्ये सध्या 'मूनलाईट जॉब' (रिकाम्या वेळेतील पैसे कमविण्याची संधी) ही संकल्पना रुजत आहे. मात्र, त्याचा वापर अशाप्रकारे गंडा घालण्यासाठीही केला जात आहे. तसेच इतर सुशिक्षित नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्रमाणसुद्धा मोठे आहे.

विचार करा…सजग रहा

सुरुवातीला मिळालेले पैसे हेच प्रलोभन आहे, त्याला बळी पडू नका.
असा कोणताही पार्टटाईम जॉब नाही की, चॅनल सबस्क्राईब करून किंवा फॉलो करून एखादी कंपनी पैसे देते.
आकर्षक परताव्याच्या लोभापोटी आपली जमा पुंजी सायबर चोरट्यांच्या हवाली करू नका.
जर आपल्यासोबत असा प्रकार घडला, तर तत्काळ सायबर पोलिसांसोबत संपर्क करा.

असे अडकवले जाते जाळ्यात…

व्हॉटस्अ‍ॅप किंवा इंस्ट्राग्राम मेसेजिंगद्वारे (रॅन्डमली) सायबर चोरटे संपर्क करतात. पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवून यू-ट्युब व्हिडीओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फॉलो लाईक, गुगलमॅप, हॉटेल रेटिंग, प्रतिक्रिया द्या, असे सांगितले जाते. तुम्ही काही चॅनल सबस्क्राईब केले किंवा व्हिडीओ लाईक केले की, तुमच्या खात्यात पैसे जमा करतात. तुम्हाला वाटते सोप्पे काम तर आहे. पैसेही लवकर मिळाले. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवता.

एकदा का सावज जाळ्यात अडकल्याचा अंदाज आला की, सायबर चोरट्यांकडून पुढचा पत्ता टाकला जातो. ते तुम्हाला पेड टास्कची ऑफर देत गुंतविलेल्या पैशावर 30 टक्के पैसे मिळण्याचे प्रलोभन दाखवितात. तुम्हाला वाटते घरी बसून तर पार्टटाईम काम करायचे आहे. गुंतवा पैसे, असा विचार करून तुम्ही पैसे चोरट्यांच्या हवाली करता. काही दिवस ते तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे दाखवतात. मात्र प्रत्यक्षात ते पैसे तुम्हाल काढता येत नाहीत. एकाप्रकारे तुम्ही आणखी पैसे भरावेत म्हणून ते तुम्हाला झुलवत ठेवतात. पहिले पैसे अडकलेत म्हणून तुम्ही दुसरे पैसे भरता. असे करून तुम्ही आठ ते दहा लाख रुपयांपर्यंत पैसे त्यांच्या हवाली करता. जेव्हा त्यांच्याकडून प्रतिसाद मिळणे बंद होते, तेव्हा आपल्याला समजते की आपण फसलो आहोत. मात्र तोपर्यंत वेळ गेलेली असते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT