Latest

PBKS vs DC : दिल्लीचा पंजाबवर शानदार विजय

Shambhuraj Pachindre

धरमशाला; वृत्तसंस्था : आयपीएलमधील बुधवारच्या लढतीत दिल्लीने पंजाबला 15 धावांनी पराभूत केले. विजयासाठी 214 धावांचे लक्ष्य समोर ठेवून उतरलेल्या पंजाबला 8 बाद 198 धावांपर्यंतच मजल मारता आली. (PBKS vs DC)

पंजाबची सुरुवातच अडखळत झाली. शेवटपर्यंत ते स्वतःला सावरू शकले नाहीत. धावफलक कोरा असताना सलामीवीर तथा कर्णधार शिखर धवन तंबूत परतला. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन (94) आणि अथर्व तायडे (55) यांचा अपवाद वगळता पंजाबच्या फलंदाजांनी निराशा केली. प्रभसिमरन सिंग याने 22 धावांचे योगदान दिले. दिल्लीच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. लिव्हिंगस्टोनने 48 चेंडूंचा सामना करताना 5 षटकार आणि 9 चौकार ठोकले. दिल्लीकडून इशांत शर्मा व एन्रिच नॉर्त्जे यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेल आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. (PBKS vs DC)

त्यापूर्वी रिले रुसो आणि पृथ्वी शॉ यांच्या वादळी अर्धशतकांच्या बळावर दिल्लीने दोन गड्यांच्या मोबदल्यात 213 धावांचा डोंगर उभारला. पंजाबकडून सॅम कुरेन याने दोन्ही गडी बाद केले. पंजाबने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तथापि, दिल्लीच्या फलंदाजांनी शिखर धवनचा हा निर्णय चुकीचा ठरवला. दिल्ली संघात पुनरागमन केलेला पृथ्वी शॉ आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार सुरुवात करून 62 चेंडूंत 94 धावांची खणखणीत सलामी दिली. वॉर्नरने 31 चेंडूंत 46 धावांची खेळी केली. यात त्याने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. पृथ्वी 54 धावांवर बाद झाला. त्याने एक षटकार आणि सात चौकारांती आतषबाजी केली.

पृथ्वी बाद झाल्यानंतर रुसो आणि फिल साल्ट यांनी वादळी फलंदाजी करत दिल्लीला मोठी धावसंख्या उभारून दिली. रुसो 82 धावांवर नाबाद राहिला. साल्टने नाबाद 26 धावांचे योगदान दिले. फिल साल्ट आणि रायली रुसो यांनी तिसर्‍या विकेटसाठी 30 चेंडूंत 65 धावा जोडल्या. साल्टने 14 चेंडूंत दोन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 26 धावा झोडल्या. तसेच रुसोने 37 चेंडूंत 82 धावांची खेळी करताना सहा षटकार आणि सहा चौकार हाणले.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT