Latest

संजय राऊतांच्‍या जामिनाला स्‍थगिती देण्‍यास उच्‍च न्‍यायालयाचा नकार : उद्या पुन्‍हा सुनावणी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संजय राऊत यांच्‍या जामिनाला स्‍थगिती मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज ईडीने उच्‍च न्‍यायालयात केला हाोता. यावर आज ( दि. ९ ) सुनावणी झाली. या प्रश्‍नी दहा मिनिटांमध्‍ये निर्णय देणे चुकीचे ठरेल, असे स्‍पष्‍ट करत उच्‍च न्‍यायालयाने संजय राऊतांच्‍या जामिनाला स्‍थगिती देण्‍यास नकार दिला. या प्रकरणी गुरुवारी पुन्‍हा सुनावणी होणार आहे. (Patra Chawl land scam ) मनी लाँड्रिंग प्रकरणात आज विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला होता.  'पीएमएलए' कोर्टाने खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या जामीन आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची  ईडीची मागणी फेटाळली होती. यानंतर ईडीने उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना गोरेगाव येथील  पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली होती. गेले १०० दिवस ते आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सहभाग असल्याचा आरोप केला आहे. राऊतांच्या वकिलांनी पत्राचाळ घोटाळ्याशी त्यांचा काही संबंध नाही नसल्याचा युक्तीवाद केला. संजय राऊत यांच्‍या जामीन अर्जावर आज बुधवारी सत्र  न्‍यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्‍यायालयाने त्‍यांना जामीन मंजूर केला.

गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या सुमारे १ हजार ४० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री या बंगल्यावर छापेमारी करुन राऊतांना चौकशीसाठी ताब्यात घेत ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली होती.

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळ्यातील ११२ कोटी रुपये प्रविण राऊत यांना मिळाले होते. प्रविण राऊतांच्या कंपनीतून १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात वळविण्यात आले. घोटाळ्यातील याच पैशांतून दादर येथील फ्लॅटसह अलिबागमध्ये १० जमिनी खरेदी करण्यात आल्याचा आरोप ईडीने राऊतांवर ठेवला. तसेच राऊत दाम्पत्याच्या बॅंक खात्यात काही मोठ्या रक्कमांचेही व्यवहार झाल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. त्याआधारे ईडीने कारवाई केली होती.

ईडीने पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी प्रविण राऊत यांच्या पालघर, सफाळे, पडघा येथील जमिनीसोबतच संजय राऊत आणि वर्षा राऊत यांचा दादरमधील फ्लॅट आणि वर्षा राऊत व सुजीत पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या भागीदारीतील किहीम, अलिबागमधील जमिनी अशा तब्बल ११.१५ कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. (Patra Chawl land scam )

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT