मुंबई : पुढारी ऑनलाईन; पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl land scam case) अटकेत असणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्याच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर १० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला याआधी ईडीने विरोध केला होता. राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीने न्यायालयात याआधी प्रत्युत्तर दिले होते. "कारवाई टाकळण्यासाठी संजय राऊत या प्रकरणात प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून काम करत होते. संजय राऊत प्रभावी नेते आहेत, त्यांना जामीन मिळाला तर ते पुरावे नष्ट करतील," असे ईडीने म्हटले आहे.
या प्रकरणात सरकारी मालमत्तेच्या मोबदल्यात संजय राऊत यांना वैयक्तिक लाभ झाला आहे. अशा प्रकारच्या भ्रष्टाचारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो, त्यामुळे राऊत यांनी जो दिलासा मागितला आहे, तो अयोग्य आहे. या प्रकरणात प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून राऊत यांनी मोठी भूमिका बजावली आहे. पैशाचा माग राहू नये, यासाठी ते पडद्यामागून काम करत होते. त्यामुळे या प्रकरणात आपल्याला कोणताही लाभ झालेला नाही, हे त्यांचे म्हणणे ग्राह्य मानता येणार नाही, असे EDने म्हटले होते.
सध्या हा खटला महत्त्वाच्या पातळीवर आहे. दररोज नवे पुरावे समोर येत आहेत. या पुराव्यातून या प्रकरणात राऊत यांनी कशी भूमिका निभावली हे पुढे येत आहे. त्यामुळे या स्थितीत त्यांना जामीन देणे योग्य होणार नाही, असे मत ईडीने नोंदवले होते. राऊत सध्या पत्राचाळ पुर्नविकास प्रकरणात अटकेत आहेत. ईडीने ज्या एक कोटी साठ हजार रुपयांची विचारणा केली होती, त्याचा खुलास करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला होता. (Patra Chawl land scam case)
हे ही वाचा :