…तर आरोप करणार्‍यांविरोधात काय भूमिका घेणार ? राज्य सरकारने जाहीर करावे : शरद पवार

…तर आरोप करणार्‍यांविरोधात काय भूमिका घेणार ? राज्य सरकारने जाहीर करावे : शरद पवार
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पत्राचाळ प्रकरणात माझी किंवा कुणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीला आम्ही तयार आहोत. जेवढ्या लवकर करता येईल तितक्या लवकर चौकशी करा. मात्र, चौकशी झाल्यानंतर जो आरोप करण्यात आला आहे, त्यात वास्तव आणि सत्याला धरुन नसेल, तर आरोप करणार्‍यांविरोधात काय भूमिका घेणार?  हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी आज (दि.२१) मुंबईत पत्रकार परिषदेत सरकारला दिले.

ज्यावेळी ही बैठक झाली, त्यावेळचे इतिवृत्त ज्या अधिकार्‍याने सही केली, ते माध्यमांना देत आहे. त्यानंतर जे कोर्टामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यात माझे नाव आहे, असे माध्यमातून बोलले जात आहे. त्या आरोपपत्रात नक्की काय आहे, ते त्यांच्या पान नंबर सातवर आणि आठवर असेल त्याची कॉपी तुम्हाला दिली आहे. म्हणजे जी चौकशी करणारी एजन्सी आहे. ती कोर्टात काय मांडते आणि राज्य सरकारची त्यावेळी जी चर्चा झाली. त्याची टिप्पणी ते काय म्हणतात. त्या दोन्ही कॉपी याची स्वच्छ भूमिका सांगितली आहे, असेही शरद पवार म्हणाले.

पराचा कावळा करु नका : जितेंद्र आव्हाड

यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पत्राचाळ प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती माध्यमांना दिली. त्यावेळी जी बैठक झाली त्याचे इतिवृत्त गृहनिर्माणचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या सहीचे पत्रासहीत माध्यमांसमोर ठेवले. बैठका घेऊन मध्यममार्ग काढणं, संवाद साधणं चुकीचं आहे का, असा सवाल करतानाच वेगवेगळ्या बैठकांचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.
याप्रकरणी चौकशी करा आमचा विरोध नाही मात्र पराचा कावळा करु नका. मी १९९० पासून आजपर्यंतचा साक्षीदार आहे. आपण हत्तीच्या मर्मस्थळावर घाव घातल्यावर हत्ती उसळतो, असं समाजाचं मत आहे. महाराष्ट्राचं मर्मस्थळ शरद पवार आहेत, हे लक्षात ठेवा, असे ठणकावून जितेंद्र आव्हाड यांनी आरोपकर्त्यांना सांगितले.

जी कागदपत्रे सादर केली त्यात चौकशी करणार्‍या एजन्सीने काय म्हटले आहे त्याचे वाचन जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले. शरद पवारांना बदनाम करण्याचा डाव आहे. आम्ही बेछूट आरोप करत नाही. जी पक्षाची आणि शरद पवारांची भूमिका आहे. ती देशाला आणि राज्याला माहीत आहे. तुम्ही आरोप केलाय ना भाजपचे अध्यक्षही काहीतरी म्हणाले आहेत. ताबडतोब चौकशी करा. अहवाल घ्या आणि हे आरोप बेछूट आणि बेजबाबदार असतील, तर संबंधितांवर काय कारवाई करणार ? हे जाहीर करा, अशी मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.

 ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर

महाराष्ट्रातील काही जिल्हयात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला २७७ जागा मिळाल्या असून भाजप – शिंदे गटाला २१० जागा मिळाल्या आहेत. यामध्ये ६०८ जागांपैकी १७३ जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर आहे तर भाजप – १६८, कॉंग्रेस – ८४, शिंदे गट – ४२ आणि शिवसेना यांची अधिकृत आकडेवारी आलेली नाही, अशी माहिती शरद पवार यांनी देतानाच राष्ट्रवादीच्या तरुणांचे अभिनंदन केले. आम्हाला माहीत असलेल्या आमच्या जागा आम्ही सांगितल्या आहेत आता त्यांना वाटत असेल त्यांच्या जागा जास्त आहेत तर त्या आनंदात त्यांनी रहावं आम्हाला त्याची चिंता नाही, असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला.

राज्यात अनेक प्रश्न, लोकांमध्ये अस्वस्थता

काही प्रश्नांवर लोकांमध्ये अस्वस्थता आहे. राज्य सरकारने जे काही निर्णय बदलले आहेत हे कारण आहे. कोरोना काळामध्ये काही मुलं किंवा पालक मृत्यूमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याचा निर्णय माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला होता. त्यामध्ये अडीच हजार इतके अनुदान देण्याचे जाहीर केले होते. ते अनुदान आताच्या सरकारने स्थगित केले आहे ही माहिती खरी असेल तर राज्य सरकारने लवकरच हा निर्णय लागू करुन अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली. यावेळी शरद पवार यांनी कोरोना काळात जे नियम लावण्यात आले होते यामध्ये आई किंवा वडील यांच्यापैकी एकच हयात आहेत अशी जी मुलं आहेत जी कोरोना काळात मृत्यूमुखी पडली त्यांची संख्या २० हजार आहे आणि ज्यांचे आई- वडील मृत्यूमुखी पडले अशा मुलांची संख्या ८०० आहे. या सर्व पालकांकडे किंवा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन सहानुभूतीचा व समंजसपणाचा सरकारचा हवा, असेही ते म्‍हणाले.

गुंतवणुकीचे वातावरण तयार करायला हातभार लावा

फॉक्सकॉनबाबत मला वेगळं मत मांडायचं नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर आनंद झाला असता त्यासाठी जागाही ठरली होती. एका नव्या प्रकल्पाला संधी मिळाली असती त्यामुळे हा प्रकल्प इथे होणे गरजेचे होते मात्र नाही झाला. तो गुजरातला गेला आता हा प्रकल्प देशात कुठेतरी होतोय म्हणून मी विरोधाला विरोधी भूमिका घेणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करतानाच राज्य सरकारने गुंतवणूकीचे वातावरण तयार केले पाहिजे. राज्यात काम करत असताना त्यावेळी दोन तास गुंतवणूक करायला येणाऱ्या लोकांना एक विश्वास द्यायला लागायचा त्यावेळी गुंतवणूक क्लायमेंट महाराष्ट्रात चांगले होते, त्याला धक्का बसला असेल. परंतु इथे राजकीय भूमिका न घेता सगळ्यांनी राज्याच्या हिताच्या गुंतवणूकीचे वातावरण तयार करायला हातभार लावावा, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.

राजकीयदृष्टया आम्ही तोंड देणार

आज 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये पहिल्या पानावर एनडीएच्या कारकीर्दीत ईडीने किती जणांवर कारवाया केल्या. कोणत्या राजकीय पक्षांवर केल्या हे सर्वांना मार्गदर्शक ठरणारे वृत्त आले आहे. या कालावधीत समाजाचे प्रश्न बाजूला ठेवून आपल्याला ज्या अपेक्षा आहेत त्या निवडणूकीनंतरच्या आहेत. त्याबद्दलची शंका दूर करण्यासाठी अन्य पक्षांच्या लोकांवर खटले भरायचे, चौकशी लावायची, अटक करायची या सगळ्या गोष्टी महत्वाचा कार्यक्रम म्हणून घेतल्या जात आहेत, असा थेट आरोप नाव न घेता करतानाच त्याला राजकीयदृष्टया आम्ही तोंड देणार आहोत, असे स्पष्टपणे शरद पवार यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री सर्वांचे असतात. त्यांनी राज्याचा विचार करावा.

राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वांचे असतात. त्यांनी राज्याचा विचार करायला हवा. त्यांना स्वतःला माहित आहे अनेकदा दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांनी भूमिका मांडली. त्यामुळे याच्यात वाद वाढवू न देण्याची जबाबदारी ही राज्य प्रमुखाची आहे. आता बीकेसीमध्ये मेळावा घ्यायला जागा मिळाली आहे याचा आनंद आहे. त्यांचा प्रश्न सुटलेला आहे. त्यानंतर जी एक परंपरा आहे त्या परंपरेसंदर्भात पहिल्यांदा मागणी उध्दव ठाकरे यांनी केली असेल तर त्या मागणीवर विलंब लावणे योग्य नाही हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी दसरा मेळावा वादाबाबत व्यक्त केली.

महाविकास आघाडी सरकारने सण बंद केले होते, असा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात निर्णय घेतला परंतु देशाच्या पंतप्रधानांनी देशाला आवाहन केले त्या काळात हे सण, उत्सव, सभा, संमेलन, लग्न या सगळ्या गोष्टींवर मर्यादा लावण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय धोरण पंतप्रधानांनी मांडले ते महाराष्ट्राने पाळले याची जाण जाणकारांना असली पाहिजे त्यामुळे ते सणांवर बंदी होते असे काही म्हणोत पंतप्रधानांचा निर्णय योग्य होता, असेही शरद पवार म्हणाले.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news