Latest

Aarti Kedar : नगरच्या पाथर्डीतील शेतकर्‍याच्या मुलीची ‘IPL’मध्ये धडक!

अविनाश सुतार

पाथर्डी शहर (अहमदनगर) : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍याच्या मुलीने कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर महिला टी-२० आयपीएल क्रिकेटमध्ये धडक मारली आहे. पाथर्डी सारख्या ग्रामीण भागातील एसव्ही नेट अ‍ॅकॅडमीची महिला क्रिकेटर आरती शरद केदार (Aarti Kedar) हिला जिल्ह्यातून महिला आयपीएल खेळण्याचा पहिला मान मिळणार आहे. आरतीचे प्राथमिक शिक्षण हात्राळ शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पाथर्डीतील एम. एम. निन्हाळी विद्यालयात, तर बाबूजी आव्हाड विद्यालयात कला शाखेत ती तृतीय वर्षात शिकत आहे.

पाथर्डी तालुक्यातील हात्राळ येथील अष्टपैलू क्रिकेटपटू आरती केदार (Aarti Kedar) हिने भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने नुकत्याच घेतलेल्या वरिष्ठ महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक १५ बळी घेतले होते. यापूर्वी महाराष्ट्र संघाकडूनही तिने चमकदार कामगिरी केलेली आहे.

१९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघात आरतीने अष्टपैलू कामगिरी करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. सन २०२१ मध्ये वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिची निवड झाली होती. आता २३ मेपासून होणार्‍या महिला आयपीएल स्पर्धेत आरती व्हेलोसिटी या संघाकडून खेळणार आहे. जिल्ह्यातून आयपीएलसाठी निवड झालेली आरती ही पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या प्रेरणेतून एस. व्ही. नेट अ‍ॅकॅडमीची वाटचाल सुरू असून अ‍ॅकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक शशिकांत निर्‍हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली आरती सराव करीत आहे.

याच अ‍ॅकॅडमीतील यष्टीरक्षक व फलंदाज अंबिका वाटाडे नॅशनल क्रिकेट अ‍ॅकॅडमी बेंगलोर या ठिकाणी माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिना क्रिकेट शिबिरात सहभागी झाली आहे. सन २०२३ मध्ये होणार्‍या १९ वर्षीय महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी हे प्रशिक्षण शिबिर असून वाटाडे यात सहभागी झाली आहे.

एस. व्ही. नेट क्रिकेट अ‍ॅकॅडमीमध्ये मुलांप्रमाणे मुलींना क्रिकेटचे धडे दिले जातात. मुलींना मोफत प्रशिक्षण दिले जाते. आरती केदारचे वडील साधारण शेतकरी कुटुंबातील आहेत. गेली सहा-सात वर्षे क्रिकेटमध्ये आरतीने मोठे कष्ट घेतले. ती दररोज गावाकडून पाथर्डीला दोन वेळेस सायकलवरून ये-जा करते. दररोजचा बत्तीस किलोमीटरचा प्रवास तिने केला. आरतीला तिच्या कष्टाचे फळ मिळाले आहे.

शशिकांत निर्‍हाळी, प्रशिक्षक

व्हॉलीबॉल खेळाकडून अचानक आमचे मार्गदर्शक प्रशिक्षक शशिकांत निर्‍हाळी यांनी सन २०१५ पासून आम्हाला क्रिकेट खेळण्याची संधी दिली. तेथून पुढे क्रिकेटची आवड लागली. आमची चांगली टीम तयार झाली. सोबत खेळणारी अंबिका वाटाडे, आरती बुर्‍हाडे या दोघीही नॅशनलला खेळल्या आहेत. ज्ञानेश्वरी वाघ ही १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाकडून खेळली आहे. क्रिकेटमध्ये आम्हाला घडविण्यात शशिकांत निर्‍हाळी यांचा मोठा मोलाचा वाटा आहे.

आरती केदार, महिला क्रिकेटपटू

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT