Latest

Pakistan Cricketer Abrar Ahmed : पाकिस्तानच्या अबरार अहमदने पदार्पणातच केली एैतिहासिक कामगिरी

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वीच पहिल्या कसोटीत पाकिस्तानला पराभूत करणारा इंग्लिश संघ शुक्रवारपासून मुलतान येथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी 281 धावांवर बाद झाला. रावळपिंडीत पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा करणारा हाच तो संघ आहे. याच सामन्यात पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या अबरार अहमद याने इंग्लंडच्या संघाला हादरवून सोडले. मिळालेल्या संधीचे सोने करत या अबरारने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात उपहारापुर्वीच ५ बळी मिळवत एैतिहासिक आणि स्वप्नवत कामगिरी बजावली आहे. (Pakistan Cricketer Abrar Ahmed)

रावळपिंडीच्या मैदानात पाकिस्तानने अबरार अहमदला उतरवले आणि इंग्लंडचा निम्मा संघ पहिल्या लंच टाईममध्ये तंबूत परतला. अर्थात या पाच ही बळी पदार्पण करणाऱ्या अबरारनेच मिळवल्या. त्याच्या फिरकी समोर इंग्लंडच्या फलंदाजांनी फक्त हजेरीच लावण्याचे काम केले. १४५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी किमया दुसऱ्यांदा करण्यात अबरार यशस्वी ठराला. या कारनाम्यामुळे २४ वर्षांच्या अबरारचे नाव कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. आता पुन्हा या विक्रमाशी बरोबरी करणे म्हणजे एक दिवास्वप्नच पाहण्यासारखेच आहे. (Pakistan Cricketer Abrar Ahmed)

अबरारच्या आधी अशी कामगिरी विंडिजचा डावखुरा फिरकीपटू अल्फ व्हॅलेंटाइनने जून 1950 मध्ये मँचेस्टरमध्ये केला होता. पहिली कसोटी खेळणाऱ्या अल्फने कसोटीच्या पहिल्या दिवशी उपाहारापूर्वी पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आणि आता जवळजवळ 72 वर्षांनंतर, अबरार अहमदने मुलतानमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंचपूर्वी पाच विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे, अल्फ व्हॅलेंटाईननंतर, अबरार हा कसोटी इतिहासातील दुसरा गोलंदाज ठरला. (Pakistan Cricketer Abrar Ahmed)

विंडिजच्या अल्फ व्हॅलेंटाईनने ८ जून १९५० रोजी कसोटीच्या पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत 17 षटकांत 4 मेडनसह 34 धावांत पाच विकेट्स घेतल्या, तर आता अबरार अहमदने 13 षटकांत विना मेडन 70 धावांत 5 बळी घेतले. पहिल्याच सामान्यातील पहिल्याच सत्रात अशी अफलातून कामगिरी केल्यामुळे आता त्याला कसोटी क्रिकेटमध्ये स्थिरावणे फारसे अवघड जाणार नाही. त्याने आता असा विक्रम रचला आहे, जो ठरवून सुद्धा मोडता येणार नाही. (Pakistan Cricketer Abrar Ahmed)

पाकिस्तानने इंग्लड विरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान अबरार अहमदला संधी दिली. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा अवघा संघ २८१ धावांत गारद झाला. अबरारने २२ षटके टाकत ११४ धावा देऊन ७ बळी मिळवले व त्याने १ षटक मेडन टाकले. त्याला गोलंदाज जाहिद मोहम्मद याची साथ मिळाली, जाहिदने ३ बळी मिळवले. २८१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या २०२ धावांत तंबुत परतला.

दुसऱ्या इंनिगमध्ये इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आणि त्यांनी ४९ षटकात ५ गडी गमावत २०२ धावांवर मजल मारली आहे. इंग्लंडकडे आता २८१ धावांची आघाडी आहे. दुसऱ्या इंनिगमध्ये अबरारने पुन्हा आपली चमक दाखवत २१ षटकात ८१ धावात देत इंग्लंडचे ३ बळी मिळवले आहेत. अशाप्रकारे पहिल्याच सामन्यात अबरारने १० बळी मिळविण्याची किमया देखील साधली आहे. अद्याप खेळ बाकी आहे आणखी किती बळी अबरार मिळवतो हे पाहण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. अबरारच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर पाकिस्तानला अब्दुल कादीर, सकलेन मुस्ताक सारखा फिरकीपटू गवसला आहे. याचे चिज होणे आवश्यक आहे.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT