Latest

Organ donation : अवयवदात्यांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

सोनाली जाधव

कोल्हापूर : ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान केले जाते. मात्र अजूनही जुन्या रूढी परंपरांसह अंधश्रद्धेत समाज गुरफटलेला आहे. अवयवदान जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. या चळवळीला बळ देण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने अवयवदात्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचे ठरविले आहे. (Organ donation)

महाराष्ट्रातील १५० ब्रेनडेड झालेल्या व्यक्तींनी अवयवदान करून अनेकांना जीवदान दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळल्यानंतर त्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. देशात अवयदान करण्यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या अवयवदानाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. कारण अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. एकाने अवयवदान केल्यास त्याचा फायदा दोन ते तीन रुग्णांना होतो. गेल्या वर्षी १४९ ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान करण्यात आले. यंदा जानेवारी २०२४ मध्ये अवयवदात्यांचा टप्पा १५० इतका झाला आहे.

Organ donation : राज्यात ६१०० जणांना अवयवांची गरज

महाराष्ट्रात ६ हजार १०० रुग्ण हे अवयवांच्या प्रतीक्षा यादीवर आहेत. दिवसागणिक ही संख्या वाढतच आहे. मागणीच्या प्रमाणात अवयव उपलब्ध होत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. प्रतीक्षा यादीत यकृत (१६०२), हृदय (११५), फुफ्फुसे (४६), लहान आतडे (२१) व मोठे आतडे (२) हवे आहेत. कोरोना काळात अवयवदान करण्यात आणि जनजागृतीला अनेक अडचणी आल्या. आता पुन्हा जनजागृतीसाठी आरोग्य विभागाने कंबर कसलो आहे. राज्यात विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती आहे. ही समिती अवयवदानाबाबत योग्य समन्वय साधते. या समितीचा आराखडा देशात सर्वोत्तम आहे.

तमिळनाडू देथातील एकमेव राज्य

तामिळनाडू राज्यात अवयदान करणाऱ्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. असा निर्णय घेणारे ते देशातील एकमेव राज्य आहे. ओडिशा राज्यातही १५ फेब्रुवारी २०२४ पासून ही संकल्पना सुरू केली आहे. त्याच धर्तीवर महाराट्रात अशी संकल्पना राबविली जाणार आहे. कर्नाटक राज्यदेखील अवयवदान चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविण्याच्या विचाराधीन आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT