Latest

पश्चिम पुण्यात महिलाराज; चार मतदारसंघांतच सर्वसाधारण गटातील महिलांना अधिक संधी

अमृता चौगुले

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : खडकवासला, हडपसर, कोथरूड आणि कसबा पेठ या चार विधानसभा मतदारसंघांतच सर्वसाधारण गटातील दुसर्‍या महिलेस अधिक संधी मिळणार आहे. उर्वरित मतदारसंघांत अनुसूचित जातींसाठी आरक्षण अधिक असल्याने त्या प्रभागात सर्वसाधारण महिलेसाठी एकच जागा आरक्षित ठेवली जाणार आहे.

मुख्यत्वे पेठांचा भाग, कोथरूड, डेक्कन, सिंहगड रस्ता, कात्रज, हडपसर या भागांत सर्वसाधारण गटातील या महिलांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. प्रत्येक प्रभागात एक जागा खुली म्हणजे सर्वांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात जास्तीत जास्त दोन जागा राखीव असू शकतील.

24 प्रभागांमध्ये 23 ठिकाणी अनुसूचित जाती आणि दोन ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी जागा आरक्षित आहेत. प्रत्येक प्रभागात सर्वसाधारण गटातील महिलेसाठी एक जागा आरक्षित असेल. त्याला अपवाद केवळ प्रभाग क्रमांक 1 असून, तेथील दोन जागा या एससी आणि एसटी गटासाठी आरक्षित झाल्या आहेत. हे 24 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक प्रभाग अशा 25 प्रभागांत सर्वसाधारण गटातील एकाच महिलेसाठी जागा आरक्षित असेल.

पुण्यातील एकूण 173 नगरसेवकांपैकी 87 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यापैकी 57 प्रभागांत एक जागा थेट सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होईल. उर्वरित 30 जागांपैकी महिलांसाठीच्या 13 जागा एससी व एसटी या गटांत आरक्षित होणार आहेत. त्यामुळे महिलांसाठीच्या 17 जागा शिल्लक राहतात. त्यामुळे एससी, एसटीसाठी आरक्षित नसलेले आणि सर्व जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेले 32 प्रभाग आहेत.

त्या प्रभागांतील पहिली जागा महिलेसाठी आरक्षित असेल. दुसर्‍या जागेसाठी सोडत काढण्यात येईल. ते प्रभाग मुख्यत्वे चार मतदारसंघांत येतात. कसबा पेठेतील चारही प्रभाग आणि खडकवासला मतदारसंघातील आठही प्रभागांपैकी एकाही प्रभागात अनुसूचित जातीसाठी आरक्षण नाही, तर कोथरूड मतदारसंघातील केवळ एका प्रभागात अनुसूचित जमातीसाठी आरक्षण आहे. कोथरूड मतदारसंघातील सातपैकी एक प्रभाग दोन सदस्यांचा आहे.

या तीन मतदारसंघांतील 17 प्रभागांत तीनही जागा सध्या खुल्या आहेत. त्यामुळे तेथे महिलांसाठी एक जागा ठरल्यानंतर दुसर्‍या जागेसाठीही सर्वसाधारण गटातील महिलांना संधी मिळू शकते. त्याचा निर्णय मंगळवारी होणार असून, त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल. हडपसरमध्ये सर्वाधिक 14 प्रभाग असून, तेथील पाच जागा आरक्षित आहेत. उरलेल्या नऊ प्रभागांत सर्वसाधारण गटातील दुसर्‍या महिलेला संधी मिळू शकेल.

शिवाजीनगरमधील पाचपैकी तीन प्रभागांत आरक्षण आहे. गोखलेनगर आणि फर्ग्युसन कॉलेज प्रभागात सर्व जागा खुल्या आहेत. पर्वती मतदारसंघातील सातपैकी पाच जागांवर एससीचे आरक्षण आहे. तेथे बिबवेवाडी आणि बालाजीनगर प्रभाग खुले आहेत. वडगाव शेरीत नऊपैकी सहा ठिकाणी आरक्षण असून, तीन प्रभाग खुले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील चारही प्रभागांत आरक्षण असल्यामुळे तेथे सर्वसाधारण गटातील दुसर्‍या महिलेसाठी आरक्षण मिळणार नाही.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT