IPL जिंकले, हार्दिक पंड्याचे आता मिशन टी-20 वर्ल्डकप | पुढारी

IPL जिंकले, हार्दिक पंड्याचे आता मिशन टी-20 वर्ल्डकप

अहमदाबाद ; वृत्तसंस्था : पहिल्याच प्रयत्नात आयपीएलचे विजेतेपद मिळवलेल्या गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याचे लक्ष्य आता देशासाठी टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचे आहे.

गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात आयपीएल 2022 चे जेतेपद पटकावून दिल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याला ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप खुणावत आहे. मागील वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. पाकिस्तान व न्यूझीलंडकडून भारताचा दारुण पराभव झाला होता.

हार्दिक पंड्या त्या संघाचा सदस्य असूनही तंदुरुस्तीच्या कारणास्तव ना त्याने धड गोलंदाजी केली, ना फलंदाजीत कमाल दाखवली. पण, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे आणि त्याने 145 कि.मी.च्या वेगाने मारा करून फिटनेस सिद्ध केली आहे. आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये त्याने ‘प्लेअर ऑफ दी मॅच’चा पुरस्कार पटकावला आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या फायनलमध्ये हार्दिकने 17 धावांत 3 विकेटस् घेतल्या आणि 34 धावाही केल्या. त्याने शुभमन गिलसोबत केलेली अर्धशतकी भागीदारी महत्त्वाची ठरली. आता हार्दिक आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी सज्ज आहे.

9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून हार्दिक टीम इंडियात पुनरागमन करणार आहे आणि त्याच्या कामगिरीकडे सार्‍यांचे लक्ष लागलेले आहे. तो म्हणाला, ‘काहीही झाले तरी आता भारतासाठी वर्ल्डकप जिंकायचा आहे. मी सर्वोत्तम देण्यासाठी तयार आहे. माझ्यासाठी नेहमीच संघ पहिला राहिला आहे. संघाला जास्तीत जास्त देणे, हे माझे लक्ष्य आहे.’

‘भारताकडून खेळणे म्हणजे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. मग ते कितीही सामने असोत. देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. भारतीय संघाचा सदस्य म्हणून मला खूप प्रेम व पाठिंबा मिळाला. त्यामुळे लाँग टर्म असो किंवा शॉर्ट टर्म मला कोणत्याही परिस्थितीत वर्ल्डकप जिंकायचा आहे.’

भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक

23 ऑक्टोबर – विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न; दुपारी 1.30 वाजल्यापासून

27 ऑक्टोबर – विरुद्ध ग्रुप ‘ए’ चा उपविजेता, सिडनी; दुपारी 12.30 वाजल्यापासून

30 ऑक्टोबर – विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ; सायंकाळी 4.30 वाजल्यापासून

2 नोव्हेंबर – विरुद्ध बांगलादेश, अ‍ॅडलेड; दुपारी 1.30 वाजल्यापासून

6 नोव्हेंबर – विरुद्ध ग्रुप ‘बी’चा विजेता, मेलबर्न; दुपारी 1.30 वाजल्यापासून

Back to top button