Latest

Onion History : प्राचीन काळी व्हिलन ठरलेला कांदा हिरो कसा झाला? जाणून घ्या कांद्याचा रंजक इतिहास

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या कांद्याचे दर वाढू लागले आहेत. कांदा महाग होऊ नये, यासाठी सरकारने निर्यातीवर निर्बंध लादले आहेत, तर शेतकऱ्यांनी या निर्बंधांचा निषेध केला आहे. कांदा हा भारतीय किचनमधील सर्वांत महत्त्वाचा घटक मानला जातो, त्यामुळे कांद्याचे दर राजकीयदृष्ट्याही संवेदनशील विषय बनतो. पण कांदा एकेकाळी भारतात फारसा वापला जात नव्हता.

मानवाने पिकवलेले सर्वात जुने पीक

कांदा मानवाने पिकवलेले सर्वांत जुन्या पिकांपैकी एक आहे, असे संशोधक मानतात. लिखित इतिहासापूर्वीही कांदा पिकवला जात होता. कांद्याचा इतिहास किमान पाच हजार वर्षं जुना आहे, पण कांद्याचा उगम नेमका कुठल्या देशातील याबद्दल मात्र संशोधकांत एकवाक्यता नाही. चीन, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, भारताचा वायव्य भाग किंवा बलुचिस्तान येथे, मध्य आशिया येथे हा कांद्याचा उगम झाला असेल असे मानले जाते. इसवी सन पूर्व ३२०० मध्ये इजिप्तमधील कबरी आणि पिरॅमिडवर कांद्यांचे शिल्प कोरलेले आहेत. राजाच्या मृतदेहांसोबत कांदे ठेवण्याची प्रथा इजिप्तमध्ये होती, त्यामुळे कांद्यांना इजिप्तमध्ये पवित्र मानले जात होते, असे मानले जाते. इजिप्तमधील ऐतिहासिक संदर्भावरून ममी निर्मितीच्या कामात आणि औषधी म्हणूनही कांद्याचा उपयोग होत असे.

Onion History : चरक संहितेत उल्लेख

चरक संहितेत कांद्याचा उल्लेख आहे. हृदरोग, सांध्याचे आजार, पचन सुधारण्यासाठी आणि दृष्टिदोष दूर करण्यासाठी कांद्याचा उपयोग होतो, असे चरक संहितेत म्हटले आहे.

Onion History : कांदा तामसिक कसा ठरला?

चरक संहितेनंतरच्या काळात मात्र आयुर्वेदासंदर्भातील काही ग्रंथात कांद्याचा उल्लेख तामसिक असा करण्यात आला. चिनी प्रवासी हु एन त्संग याने शहराच्या भिंतीपलीकडील फक्त काही लोकच कांदा खातात, असा उल्लेख ७व्या शतकात करून ठेवला आहे. द प्रिंटवरील लेखात मुघल भारतात आल्यानंतर १५२६ आणि १५५६ नंतर भारतात कांदा मुख्य प्रवाहात आला असे म्हटले आहे. पण काही पंथात मात्र कांदा वर्ज्य मानला गेला होता.

Onion History : कांद्याचे प्रकार

भारतात जवळपास ३० प्रकारचे कांदे पिकवले जातात आणि प्रत्येक कांद्याची चव वेगवेगळी असते. भारतीय पदार्थांतील सर्वांत महत्त्वाचा घटक कांदा आहे, त्यामुळे कांद्याचे दर भारतात संवेदनशील विषय बनतो. कांदा खरीप, रब्बी आणि उशिराची रब्बी अशा तीन कालावधित वर्षभर पिकवला जातो. खरीपमधील पिकवलेल्या कांद्यात आर्द्रता जास्त असते आणि तो जास्त काळ टिकत नाही. तर रब्बीतील कांद्यात आर्द्रता कमी असते आणि तो जास्त काळ टिकतो. तुर्कीतून येणाऱ्या कांद्यात आर्द्रता जास्त असते, तर इजिप्तमधून येणारा कांदा जास्त कडवट असतो. भारतीय कांद्याशी जास्त साधर्म्य असणारे कांदे हे बंगलादेश आणि पाकिस्तानात पिकवले जातात.

कांदा दिला तरच सैन्य लढेल!

अमेरिकेत जेव्हा गृहयुद्धाचा भडका उडला होता तेव्हा जनरल ग्रांट यांनी अमेरिकेच्या युद्ध विभागाला पत्र लिहिले होते. ते म्हणतात, "माझे सैन्य कांदा मिळाल्याशिवाय लढणार नाही." त्या काळी जखमेवर उपचार करण्यासाठी कांद्याचा वापर केला जात असे, त्यामुळे ग्रांट यांनी कांद्यांची मागणी केली होती. हे वाक्य कांद्याचे महत्त्व सांगण्यासाठी बऱ्याच वेळा सांगितले जाते.

हे ही वाचा: 

SCROLL FOR NEXT