Latest

विट्यात आता जिवंत काडतुसांसह देशी बनावटीची पिस्तूल विक्री ? एकास अटक

निलेश पोतदार

विटा : पुढारी वृत्तसेवा खानापूर तालुक्यातील आळसंद येथे विक्रीसाठी आणलेल्या १७ तलवारींचे प्रकरण ताजे असतानाच आता जिवंत काडतुसांसह देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आणलेल्या एका अल्पवयीन तरुणास अर्थात विधी संघर्ष बालकास विटा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ४० हजाराचे पिस्तूल ५०० रुपयांचे काडतूस आणि दुचाकी गाडी असा एकूण ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, सांगलीच्या पोलीस अधिक्षकांनी काल (शुक्रवार) आणि आज (शनिवार) या दोन दिवसात तालुक्यात कोंबींग ऑपरेशन, अमावस्‍या नाकाबंदी, ऑलआउट' ऑपरेशन राबवा असे आदेश दिले होते. त्यानुसार विट्यात पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब कन्हेरे, अमर सुर्यवंशी, राजेंद्र भिंगारदेवे, सुरेश भोसले, शशिकांत माळी, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे आणि महेश देशमुख हे विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त अर्थात पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी पोलीस हवालदार महेश संकपाळ यांना टीप मिळाली की, विटा ते खानापूर रस्त्यावर बळवंत कॉलेजजवळच्या टेंभू योजनेच्या कॅनॉलवर एक विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणजे १५ ते १८ वर्षाच्या आतील तरुण हा देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी घेवून आला आहे. त्यावर पोलीस निरीक्षक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कन्हेरे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता, संबंधित व्यक्ती आढळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक मॅगझीन असलेले त्याच्या मुठीस दोन्ही बाजुस प्लॅस्टिकचे काळया रंगाचे कव्हर असलेले देशी बानावटीचे पिस्तुल व एक जिवंत राउंड काडतूस होते.

त्याच्या कडून ४० हजार रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तुल, ५०० रुपये किमतीचे एक जिवंत राउंड आणि ५५ हजार रुपयां ची एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल असा एकुण ९५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

विधी संघर्ष बालक म्हणजे कोण?

१५ ते १८ वर्षाच्या आतील मुलास विधी संघर्ष बालक म्हणतात. बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) अधिनियम २००० मध्ये अशी गुन्हेगारी कृत्ये केलेल्या मुलांना 'विधिसंघर्षग्रस्त' बालक असं म्हटलं आहे. हा कायदा असं मानतो की, मूल गुन्हेगार नसतं. तर विशिष्ट परिस्थितीत मूल गुन्ह्याचं कृत्य करतं. त्यामुळं त्याला कायद्याच्या प्रकियेतून जाणं अनिवार्य होतं, यासाठी त्याला विधिसंघर्षग्रस्त किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेलं मूल असं म्हटलं जातं.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT