पुढारी ऑनलाईन : तुम्हाला स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. आरबीआयने सार्वभौम सुवर्णरोखे योजना दोन टप्प्यात लाँच केली आहे. या योजनेची २०२३-२४ मधील (Sovereign Gold Bond Scheme 2023-24) पहिली सीरिज १९ जून रोजी खुली होत आहे. ही सीरिज २३ जून पर्यंत राहणार आहे. तर दुसरी सीरिज ११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुली राहणार आहे.
केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्णरोखे योजनेच्या २०२३-२४ च्या पहिल्या सीरिजसाठी सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ५,९२६ रुपये निश्चित केली आहे, जी १९ जूनपासून पाच दिवसांसाठी सदस्यत्वासाठी खुली केली जाईल, असे वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. "सार्वभौम सुवर्णरोखे २०२३-२४ (Series I) १९-२३ जून या कालावधीत खुली राहील. याची सेटलमेंट तारीख २७ जून पर्यंत आहे," असे मंत्रालयाने नमूद केले आहे.
सार्वभौम सुवर्णरोखे योजनेतंर्गत सोने विक्री शेड्यूल्ड कमर्शियल बँका (छोट्या वित्त बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL) द्वारे केली जाणार आहे.
सार्वभौम सुवर्णरोखे ही योजना भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून राबविली जाते. जर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करत असाल तर प्रति ग्रॅम ५० रुपये डिस्काउंट मिळणार आहे. RBI ने १६ जून रोजी या योजनेची सविस्तर माहिती जारी केली आहे. डिस्काउंटमुळे गुंतवणूकदारांना एक ग्रॅम सोने ५,९२६ रुपयांना मिळणार आहे.
या गोल्ड बाँड योजनेत भारतीय नागरिक, ट्रस्टस, विद्यापीठ आणि चॅरिटेबल संस्था गुंतवणूक करु शकतात. या योजनेचा कालावधी ८ वर्षाचा आहे. जर तुम्हाला या आधीच पैसे काढायचे असतील तर ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काढू शकता. या योजनेत कोणताही गुंतवणूकदार कमीत कमी एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करु शकतो. वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी कमाल गुंतवणूक मर्यादा ४ किलोग्रॅम एवढी असेल. ट्रस्ट आणि इतर संस्थांसाठी एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त २० किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करु शकतात.
गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना वार्षिक २.५ टक्के फिक्स्ड रेटनुसार व्याज मिळेल. याचे पेमेंट नॉमिनल व्हॅल्यूवर प्रत्येक सहामाही असे मिळेल. ही सरकारची योजना आहे. ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. यात कोणतीही जोखीम नाही. ही योजना सोन्यात इलेक्ट्रॉनिक स्वरुपात गुंतवणूक करण्याची सुविधा देते. फिजिकली गोल्डच्या सुरक्षेची मोठी समस्या आहे. यामुळे सोन्याची चोरी होण्याची भिती असते. पण गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक केल्याने सोने चोरीची चिंता मिटते.
केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये सार्वभौम सुवर्णरोखे (Sovereign Gold Bond Scheme) योजना सुरू केली होती. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर सोन्याचे बार अथवा सोन्याच्या नाण्याऐवजी एक कागद दिला जातो. सार्वभौम सुवर्ण रोखे योजना ही डिजिटल आणि डिमॅट अशा स्वरूपातदेखील गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे. जेव्हा आपण दुकानांत सोने खरेदी करतो तेव्हा सोन्याच्या दागिन्यावरील घडणावळ खर्च द्यावा लागतो. सोन्याच्या किमतीवर तीन टक्के जीएसटी आहे. तर घडणावळवर ५ टक्के जीएसटी आकारला जात आहे. यामुळे दुकानात सोने खरेदी करताना ते ग्राहकांना महाग पडते. पण सुवर्णरोखे योजनेतील सोन्याच्या गुंतवणुकीवर कसलाही कर आकारला जात नाही. ही गुंतवणूक रोखे स्वरुपात असल्याने त्यावर घडणावळ शुल्कही आकारले जात नाही. (Sovereign Gold Bond Scheme 2023-24)
हे ही वाचा :