Latest

Odisha train collision : पाच सेकंदांचा थरार अन् पुनर्जन्माची अनुभूती

Shambhuraj Pachindre

कटक; वृत्तसंस्था : बालासोरच्या अपघातात अवघ्या पाच सेकंदांत शेकडो कुटुंबांच्या बाबतीत होत्याचे नव्हते झाले; पण बंगालच्या पाल कुटुंबांसाठी मात्र पुनर्जन्माचाच प्रसंग घडला. महिसादल येथील सुब्रतो पाल, देबश्री पाल आणि त्याचा मुलगा असे तिघे जण चेन्नईला मुलाला डॉक्टरकडे उपचारांसाठी नेत होते. बालासोर स्थानकानंतर अचानक रेल्वेला प्रचंड धका बसला आणि डब्यात प्रचंड धूर जमा झाला. समोरचे काहीच दिसत नव्हते. (Odisha train collision)

फक्त आरडाओरड ऐकू येत होती. लोक एकमेकांच्या अंगावर पडले होते. आम्हाला आमचा मुलगा सापडत नव्हता. कितीतरी वेळानंतर बाहेरून लोकांचा गलका ऐकू आला. कुणी तरी खिडकी फोडली आणि त्या लोकांनी आम्हाला बाहेर काढले. बाहेर जागोजागी मृतदेह पडलेले, वेदनांनी विव्हळणारे जखमी आणि काही जणांचे अवयव होते. मोबाईलच्या प्रकाशात स्थानिकांनी आम्हाला थोडे दूर नेले, पाहतो तर तिथे आमचा मुलगा भेदरून आम्हा दोघांनाच शोधत होता. देवाने आम्हाला पुनर्जन्म दिला, याशिवाय मनात दुसरी भावनाच नाही, असे सुब्रतो व देबश्री यांनी सांगितले. (Odisha train collision)

कर्नाटकाचे यात्रेकरू बचावले

बंगळूर ते हावडा रेल्वेने झारखंडच्या सम्मेद शिखरजी यात्रेसाठी निघालेले कर्नाटकातील 110 यात्रेकरू या अपघातातून बचावले. हे सारे जण चिकमंगळूरच्या कलसा येथील आहेत. हे सारे जण रेल्वेत भजन करत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि रेल्वे हिसके देत थांबली. आम्ही बाहेर आलो आणि पाहतो तर अनेक डबे एकमेकांवर पडले होते. प्रचंड आवाज येत होते. सुदैवाने आमचा डबा मागचा असल्याने आम्ही सारे बचावलो असे प्रवीण जैन या प्रवाशाने सांगितले.

हावडा स्थानकाचे झाले रुग्णालय

अपघातानंतर 643 जखमी प्रवाशांना एका विशेष रेल्वेने हावडा येथे पाठवण्यात आले. ही रेल्वे स्थानकावर दाखल झाली आणि त्या सर्व प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच उपचार करण्यात आले. त्यासाठी राज्य सरकारने विशेष पथके तैनात केली होती. शिवाय अधिक गंभीर रुग्णांसाठी 15 अ‍ॅम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या जखमी प्रवाशांना अन्नाची पाकिटे, औषधे देण्यासाठी स्वयंसेवकही सज्ज होते.

मी कसा बचावलो देवालाच ठाऊक

मणिकल तिवारी हे बालासोरचे रहिवासी कटकला जाण्यासाठी कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये बसले होते. त्यांनी त्यांची कहाणी सांगितली. ते म्हणाले, घरी मुलांना रेल्वे किती वेगाने जात आहे हे दाखवण्यासाठी व्हिडीओ कॉल केला होता. तेवढ्यात कानठळ्या बसवणारा आवाज झाला.

डब्यातील माणसे इकडे तिकडे फेकली गेली. माझ्या डोक्याला मार बसला होता, प्रचंड रक्त वाहात होते, हातालाही जखमा झाल्या होत्या. कसाबसा बाहेर आलो तर अपघाताचे भिषण द़ृश्य दिसले. शेकडो लोक पडले होते. माझ्या समोर बसलेल्या जोडप्यातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला, त्याची पत्नी बचावली. मी कसा बचावलो ते देवालाच ठाऊक.

देशातील भीषण रेल्वे अपघात

1981 : बिहारमध्ये पॅसेंजर रेल्वे रुळावरून घसरली, ती बागमतीजवळील मानसी नदीत कोसळली. 500 प्रवासी मृत्युमुखी.
1995 : फिरोजाबाद येथे कालिंदी एक्स्प्रेसवर पुरुषोत्तम एक्स्प्रेस धडकली. 358 प्रवासी दगावले.
1998 : गोल्डन टेम्पल मेल आणि जम्मू तावी-सिल्वा एक्स्प्रेसच्या अपघातात 212 ठार.
1999 : गैंसल (आसाम) येथे 2 रेल्वेची टक्कर. 290 प्रवासी मृत्युमुखी.
2002 : रफिगंज येथे राजधानी एक्स्प्रेस रुळावरून घसरली. 140 प्रवासी ठार.
2005 : वालिगोंडा येथे रेल्वे पूल वाहून गेल्यामुळे डेल्टा फास्ट पॅसेंजरमधील 114 प्रवासी ठार.
2010 : पश्चिम बंगालमध्ये ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्स्प्रेस स्फोटामुळे रुळावरून घसरली. त्यानंतर मालगाडीला जाऊन धडकली. या अपघातात 170 प्रवासी दगावले.
2011 : उत्तर प्रदेशातील इटाह या गावाजवळील क्रॉसिंगवर छप्रा-मथुरा एक्स्प्रेस बसला धडकली. 69 प्रवासी ठार.
2016 : कानपूरलगतच्या पुखरायणजवळ इंदूर-पाटणा एक्स्प्रेस रुळावरून घसरली. 150 प्रवासी ठार, 150 प्रवासी जखमी झाले होते.
2016 : कानपूरजवळ इंदूर-पाटणा एक्स्प्रेस रुळावरून घसरली. 150 ठार, 150 जखमी.

तुफान वेग, चुकीचा सिग्नल, ट्रॅक चेंज; जुळून आले दुर्दैवी योग

तुफान वेग, चुकीचा सिग्नल, ट्रॅक चेंज (भलत्या रुळावर जाणे) आणि डिरेलिंग (रुळावरून घसरणे) असे सारे दुर्दैवी योग या अपघातापूर्वी जुळून आले आणि बालासोर येथील बहानगा बाजार स्थानकाजवळ बंगळूर-हावडा एक्स्प्रेस- शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस-मालगाडी असा ट्रिपल ट्रेन अ‍ॅक्सिडेंट झाला. कोरोमंडलचे इंजिन थेट मालगाडीवर चढले. खडगपूर रेल्वे विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीअंती, ओडिशा ट्रिपल ट्रेन दुर्घटनेचे मुख्य कारण ऐनवेळी निकामी झालेली सिग्नल यंत्रणा असल्याचे म्हटलेले आहे. त्यामुळेच ताशी 130 कि.मी. वेगाने मुख्य मार्गाऐवजी कोरोमंडल लूपलाईनमध्ये शिरली आणि उभ्या मालगाडीला धडकली.

कोरोमंडलचे काही डबे बाजूच्या रुळावरही जाऊन पडले. त्याचवेळी ताशी 116 कि.मी. वेगाने बंगळूर-हावडा सुपरफास्ट ट्रेन रुळावर पडलेल्या कोरोमंडलच्या डब्यांवर धडकली.

'दुर्दैवातही देवावर, दैवावर विश्वास अढळ'

प्रवासी क : आम्ही एस 5 बोगीत होतो. मी झोपेतच होतो आणि अपघात झाला. कानाचे पडदे फाटावेत इतका मोठा आवाज झाला आणि मला जाग आली. रेल्वे उलटलेली होती. माझे बर्थ सर्वात वरचे होते. एक क्षण मी पंखा धरून बसलो. 'वाचवा, वाचवा' अशी एकच आरडाओरड सुरू होती.

मी उतरलो. पॅन्ट्री कारने पेट घेतल्याचे मला दिसले. पळत सुटलो. वाटेत हात नसलेली, पाय नसलेली मृत माणसे पडलेली दिसली. बाहेरून कुणाची मदत तोवर आलेली नव्हती.

गाडीतले लोकच एकमेकांना मदत करत होते. या विपरीत परिस्थितीतही देवावर, दैवावर विश्वास अढळ करणारे एक द़ृश्य मी पाहिले. माझ्या बोगीत एक दोन वर्षांचा मुलगा होता. त्याला काहीही झालेले नव्हते. मी त्याला कडेवर घेतले आणि बोगीबाहेर
आलो.

हेही वाचा; 

SCROLL FOR NEXT