Latest

Odisha train collision : प्रियजनांचे विखुरलेले अवशेष गोळा करताना अश्रूंचा फुटला बांध अन् इथे ओशाळला मृत्यू..!

Shambhuraj Pachindre

भुवनेश्वर; वृत्तसंस्था : रेल्वेतून प्रवास म्हणजे बर्‍यापैकी सुरक्षिततेची खात्री. पायलट, सिग्नल यंत्रणा, रेल्वे पोलिस आपल्या केसाला धक्का लागू देणार नाहीत, याचीही शाश्वती असतेच. जायचे त्या ठिकाणी जी काही रेल्वे पोहोचण्याची वेळ असेल, त्या वेळेपर्यंत मी पोहोचलोच, असे लोक फोन करून ज्याला भेटायचे आहे, त्याला मोठ्या आत्मविश्वासाने सांगत असतात. ओडिशातील भयंकर रेल्वे अपघाताने या विश्वासाला तडा गेला आहे. (Odisha train collision)

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता झालेला हा रेल्वे अपघात भीषणाहून भीषण होता. कोरोमंडल एक्स्प्रेसचे मालगाडीच्या रॅकवर चढलेले इंजिन त्याची साक्ष देते. कितीतरी डबे होत्याचे नव्हते झाले. अनेक प्रवासी दारांतून बाहेर फेकले गेले. खिडक्यांचा काचा, जाळ्या फुटूनही प्रवासी बाहेर फेकले गेले. (Odisha train collision)

कुटुंबासह, नातेवाईकांसह, मित्रांसह प्रवासाला असलेले लोक अंधारात ओक्साबोक्षी रडतच आपल्या प्रियजनांचा शोध घेत होते. काहींनी धडावरून, धडावरील कपड्यांवरून आपल्या आप्ताला ओळखले. काहींना धड मिळाले, तर शिर मिळाले नाही. लोकांची रडत, ओरडत, आप्तांचे विखुरलेले तुकडे गोळा करून त्याचा परिपूर्ण मृतदेह तयार करण्यातील व्यग्रता पाषाणालाही पाझर फोडेल, अशी होती. या काळजाला घरे पाडणार्‍या महादुर्घटनेने साक्षात मृत्यूही ओशाळला असेल! स्थानिक लोकांनी या दुर्दैवी प्रसंगात दाखविलेल्या माणुसकीचा आधार या आक्रोशाला मिळाला म्हणून बरे, अन्यथा या अरण्यरुदनाची काय दशा झाली असती, त्याची कल्पनाही अंगावर काटा उभा करते.

स्थानिकांनी शिड्या लावून बोगीत अडकलेल्या लहान मुलांना आणि महिलांना बाहेर काढले. हे लोक रात्री उशिरापर्यंत अथक राबले. सुरुवातीला लोकांनीच जखमींना रुग्णालयातही दाखल केले. रुग्णालयातही अनेक लोक जखमींच्या मदतीसाठी तत्पर राहिले. बचाव पथकाने कटरने डब्यांचे पत्रे कापून अडकलेल्यांना बाहेर काढले.

मोबाईल लाईटमध्ये बचावकार्य…

अपघाताच्या वेळी अंधार असल्याने स्थानिक लोकांनी मोबाईलचा फ्लॅश लाईट लावून बचावकार्य केले. लोक ट्रेनवर चढले, मग डब्यांत शिरले. जखमींना बाहेर काढून आणि रुग्णवाहिकेत नेले. जखमींना मदतीसाठी 2000 हून अधिक लोक रात्रभर बालासोर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या बाहेर उभे राहिले. अनेकांनी रक्तदानही केले.

बंगळूर-हावडा अन् कोरोमंडल

बंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस 1 जून रोजी सकाळी 7.30 वाजता यशवंतपूर स्थानकावरून निघाली. 2 जून रोजी रात्री 8 च्या सुमारास हावडा येथे ती पोहोचणार होती. नियोजित वेळेपेक्षा 3.30 तासांच्या विलंबाने 6.30 वाजता भद्रक येथे ती पोहोचली. पुढचे स्टेशन बालासोर होते.

शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस हावडाहून 2 जून रोजी दुपारी 3.20 वाजता निघाली. 3 जून रोजी दुपारी 4.50 वाजता चेन्नई सेंट्रलला पोहोचणे अपेक्षित होते. संध्याकाळी 6.37 वाजता बालासोरला ती वेळेवर पोहोचली. पुढचे स्टेशन भद्रक येण्याआधी 7 च्या सुमारास बहानागा बाजार स्थानकाजवळ हा अपघात झाला.

हे काही थरारक अनुभव

प्रवासी अ (महिला) : माझा नुकताच डोळा लागलेला होता आणि अचानक 10-12 माणसे माझ्या अंगावर पडली. श्वास घेणेही कठीण होते. मी कसेतरी डब्यातून बाहेर आले. बाहेरील द़ृश्य भयावह होते. हातपाय गमावलेले रक्तबंबाळ लोक बघून मला धक्का बसला. माझा आवाजही गेला. सामान विखुरलेले होते.

प्रवासी ब : बालासोरहून मी 6 वाजून 40 मिनिटांनी चढलो आणि 15 मिनिटांनंतर हा अपघात झाला. माझे नाव सौम्यरंजन शेट्टी. मी बालासोरमध्ये काम करतो. राहायला भद्रकमध्ये आहे. अपघातानंतर मी स्वत: जखमी अवस्थेत बोगीबाहेर पडलो आणि याउपर अडकलेल्या तीन-चार जणांना बाहेर काढण्यात मदत केली. एकाने मला पाणी पाजले. रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणले.

मूल रडता रडता मरण पावले…

स्थानिक नागरिक : टूटू विश्वास या स्थानिक नागरिकाने सांगितले की, जोरदार आवाज झाल्याने आम्ही घराबाहेर आलो. दुर्घटनास्थळी पोहोचलो तेव्हा अनेक लोक विव्हळत होते. आई-वडिलांच्या मृतदेहाजवळ एक लहान मूल रडत होते. मी त्याच्याकडे धावलो. ते मूल रडता रडता कोसळले. मी त्याला उचलले, तर तेही मरण पावलेले होते.

हेही वाचा;  

SCROLL FOR NEXT