Latest

ODI WC 2023 : विंडीजची विश्वचषक पात्रता धोक्यात

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 70 आणि 80 च्या दशकात जगातील सर्वात बलवान समजल्या जाणार्‍या वेस्ट इंडिज संघावर आता विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता फेरी खेळण्याची नामुष्की ओढवली असून इतकेच नाही, तर शनिवारी झिम्बाब्वे विरुद्ध पराभूत झाल्याने त्यांना आता विश्वचषकासाठी पात्रता मिळणेही कठीण झाले आहे. झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या विश्वचषक 2023 पात्रता स्पर्धेत हा संघ जर-तरच्या समीकरणात फसला असून त्यातील काही फासे उलटे पडले, तर पहिले दोन वर्ल्डकप जिंकणारा हा संघ यंदाच्या विश्वचषकात खेळताना दिसणार नाही. (ODI WC 2023)

झिम्बाब्वेविरुद्धच्या विश्वचषक पात्रता सामन्यात वेस्ट इंडिजचा 35 धावांनी पराभव झाला. 268 धावा केल्यानंतर झिम्बाब्वेने वेस्ट इंडिजला 233 धावांवर रोखले. ही त्यांची स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. या पराभवानंतर वेस्ट इंडिज अ गटात तिसर्‍या स्थानावर असून ते सुपर-6 मध्ये पोहोचू शकतात; पण तेथून खरा मार्ग खडतर बनणार आहे. कारण, सुपर-6 मध्ये टॉप-2 स्थान मिळविणारा संघ अंतिम फेरीत पोहोचण्याबरोबरच वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करेल. (ODI WC 2023)

झिम्बाब्वेने आपल्या गटातील तिन्ही संघांना पराभूत केले आहे, ज्यांनी सुपर-6 मध्ये स्थान मिळवले आहे. म्हणजेच सुपर-6 मध्ये झिम्बाब्वे 6 किंवा 8 गुणांसह पोहोचेल. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने पराभूत केलेले दोन संघ बाहेर पडले आहेत. आता त्यांना नेदरलँडविरुद्ध खेळायचे आहे. वेस्ट इंडिजने तो सामना जिंकला, तरी ते 6 गुणांसह सुपर-6 मध्ये पोहोचतील.

कसे आहे समीकरण?

झिम्बाब्वेला सुपर-6 मध्ये 3 सामने खेळावे लागणार आहेत. त्यात संघाने तिन्ही जिंकल्यास ते थेट विश्वचषकात पोहोचतील. श्रीलंकेनेही दुसर्‍या गटातून सुपर 6 मध्ये प्रवेश केला आहे. श्रीलंकेला हरवणे दोघांसाठी सोपे नसेल. श्रीलंकेने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांना हरवले, तरी वेस्ट इंडिजचा प्रवास संपुष्टात येऊ शकतो. श्रीलंका झिम्बाब्वेला पराभूत करेल आणि वेस्ट इंडिज सर्व सामने स्वतः जिंकेल, अशी आशा आता वेस्ट इंडिजला ठेवावी लागेल. यानंतर वेस्ट इंडिज चांगल्या धावगतीने विश्वचषकासाठी पात्र ठरू शकेल.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT