Latest

NZ vs SL Test : श्रीलंका पराभवाच्या छायेत, न्यूझीलंड मालिका विजयाच्या उंबरठ्यावर!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : NZ vs SL Test : श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या कसोटीत यजमान न्यूझीलंडने (NZ vs SL) आपली पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव 66.5 षटकांत 164 धावांवर गुंडाळून किवींनी पाहुण्या संघाला फॉलोऑन दिला आणि पुन्हा एकदा फलंदाजी करण्याची संधी दिली. दिवसाअखेर श्रीलंकेने आपल्या दुसऱ्या डावात 43 षटकात 2 गडी गमावून 113 धावा केल्या असून ते अजूनही 303 धावांनी मागे आहेत. कुसल मेंडिस 50 आणि अँजेलो मॅथ्यूज 1 धावा करून नाबाद आहेत.

दुसऱ्या दिवसाच्या 2 बाद 26 धावांच्या पुढे खेळायला उतरलेल्या श्रीलंकेला तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात झटपट दोन झटके बसले. 19.1 व्या षटकात श्रीलंकेची धावसंख्या 27 असताना टीम सौदीने प्रभात जयसूर्या (4)ला तंबूत पाठवले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या अँजेलो मॅथ्यूजला (1) किवी गोलंदाजांनी खेळपट्टीवर स्थिरावण्याची संधी दिली नाही. मॅट हेन्रीने 22.1 व्या षटकात 34 धावांवर पाहुण्या संघाला चौथा झटका दिला. इथून पुढे दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चंडिमल या जोडीने डाव सांभाळला. दोघांनी संघाची धावसंख्या शतकाच्या पुढे नेली. यादरम्यान करुणारत्नेने आपले अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापर्यंत श्रीलंकेने 51 षटकांत 4 बाद 109 धावा केल्या होत्या. (NZ vs SL Test)

उपाहारानंतर चंडीमल 37 धावा करून बाद झाला. धनंजय डी सिल्वाला खातेही उघडता आले नाही. निशान मदुष्काच्या बॅटमधून 19 धावा आल्या. खालच्या फळीतील फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ 66.5 षटकांत 164 धावांत गारद झाला. (NZ vs SL Test)

याचबरोबर श्रीलंका फॉलोऑन टाळण्यात अपयशी ठरली आणि किवीज संघाला 416 धावांची आघाडी मिळाली. श्रीलंकेच्या 8 फलंदाजांना दुहेरी धावसंख्येचा आकडाही गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 20 षटकात 6 मेडन आणि 44 धावा देत 3 बळी घेतले. मायकेल ब्रेसवेललाही 3 बळी मिळाले. करुणारत्नेने सर्वाधिक 89 धावा केल्या. (NZ vs SL Test)

न्यूझीलंडने पाहुण्यांना फॉलोऑन दिला. यानंतर श्रीलंकेने आपल्या दुसऱ्या डावात चहापानापर्यंत 9 षटकांत बिनबाद 12 धावा केल्या, पण चहापानानंतर श्रीलंकेला पहिला धक्का ओशादा फर्नांडोच्या रूपाने बसला. तो 5 धावा करून बाद झाला. यानंतर दिमुथ करुणारत्ने आणि कुसल मेंडिस यांनी अर्धशतकी भागीदारी रचली आणि संघाची धावसंख्या 97 पर्यंत नेली. करुणारत्ने अर्धशतक झळकावले. पण तो 51 धावांवर बाद झाला. मेंडिसनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. तिस-याचा दिवसाचा खेळ संपला तेव्हा मेंडिसने 50 आणि अँजेलो मॅथ्यूजने 1 धावा काढून तंबूत परतले.

करुणारत्नेची एकाच दिवसात दोन अर्धशतके

करुणारत्नेने वेलिंग्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दोन अर्धशतके झळकावली. आता तो आशियाबाहेर सर्वाधिक 50+ धावा करणारा श्रीलंकेचा सलामीवीर बनला आहे. त्याने हा पराक्रम 15 वेळा केला आहे. यापूर्वी मारवान अटापट्टूने आशियाबाहेर 50+ धावांचा टप्पा 13 वेळा पूर्ण केला होता. करुणारत्ने आपला 84 वा कसोटी सामना खेळत असून त्याने 14 शतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने 1 द्विशतक आणि 34 अर्धशतकेही केली आहेत.

मेंडिसचे 17 वे अर्धशतक

या सामन्यात मेंडिसने कसोटी कारकिर्दीतील 17 वे अर्धशतक पूर्ण केले. त्‍याने कसोटीमध्‍ये 7 शतके झळकावली आहेत. त्याने 56 कसोटीत 3,500 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे 196 आहे.कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 35 च्या आसपास आहे. न्यूझीलंडविरुद्ध मेंडिसचा रेकॉर्ड अप्रतिम आहे. त्याने 8 कसोटीत सुमारे 45 च्या सरासरीने 600 हून अधिक धावा केल्या आहेत.

दुसऱ्या दिवशीचा खेळ कसा होता?

दुसरा दिवस न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गाजवला. यजमान संघाच्या फलंदाजांनी पहिल्याच चेंडूपासून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. केन विल्यमसनने 296 चेंडूंचा सामना करत 23 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 215 धावा केल्या. त्याला हेन्री निकोल्सने साथ दिली आणि त्याने 240 चेंडूत 200 धावा केल्या. श्रीलंकेकडून कसून राजिताने 2 बळी घेतले.

SCROLL FOR NEXT