

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघाचे रेकॉर्ड खूप चांगले आहे. मुंबईत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला घाम फुटला. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2-0 अशा फरकाने मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
तीन वर्षांनंतर विशाखापट्टणममध्ये सामना खेळवला जात आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागलेली आहे. सर्व तिकिटे विकली गेली आहेत पण हवामानामुळे या सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
विशाखापट्टणममध्ये रविवारी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 24 तासांत आंध्र प्रदेश आणि विशाखापट्टणमच्या किनारी भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे. शनिवारी सकाळी विशाखापट्टणममध्ये तापमान 30 अंशांवर गेले होते आणि आकाश निरभ्र होते. पण संध्याकाळपर्यंतच आकाशात काळे ढग दाटून आले. आर्द्रता 89 टक्के होती तर 14 किमी वेगाने वारे वाहत होते.
रविवारच्या हवामान अंदाजानुसार किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशातील नऊ आणि रायलसीमा भागातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसादरम्यान ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील आणि यादरम्यान विजांच्या कडकडाटासह विजांचा लखलखाटही होईल. रविवारी 31 ते 51 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान बहुतेक वेळा आकाश ढगाळ असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांसह स्टेडियमचे अधिकारी पाऊस पडू नये म्हणून प्रार्थना करत आहेत.
विशाखापट्टणम जिल्हा क्रिकेट असोसिएशन (VCCA) च्या सदस्याने सांगितले की, हवामान खात्याने रविवारी सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शुक्रवारीही पावसाची शक्यता होती, मात्र तो अंदाज खोटा ठरला. मात्र, दुर्दैवाने रविवारी पावसाची दाट शक्यता आहे.
पावसाला सामोरे जाण्याच्या व्यवस्थेबाबत व्हीडीसीए सदस्य म्हणाले, पाऊस पडल्यास शनिवारी रात्री होईल आणि सकाळपर्यंत थांबेल. मैदानाची ड्रेनेज व्यवस्था अतिशय चांगली आहे. संपूर्ण मैदान झाकण्याची उत्तम व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत पावसाचा परिणाम खेळपट्टी आणि मैदानावर परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे. आउटफिल्ड देखील खूप लवकर कोरडे होते. पाऊस थांबल्यानंतर मैदान तयार होण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तास लागतील. आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनला आशा आहे की पाऊस पडला तरी सामना 20-20 षटकांचा खेळवला जाऊ शकतो. ग्राउंड स्टाफ व्यतिरिक्त ACA ने मदतीसाठी आणखी 30 लोकांना सज्ज ठेवले आहे.