IND vs AUS ODI: भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार ‘हे’ बदल, 10 वर्षांनी पुनरागमन करणार ‘हा’ खेळाडू? | पुढारी

IND vs AUS ODI: भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार ‘हे’ बदल, 10 वर्षांनी पुनरागमन करणार ‘हा’ खेळाडू?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात कांगारू संघाचा 5 गडी राखून पराभव करत टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत आज (दि. 19) मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने रोहित सेना मैदानात उतरेल.

भारतीय संघात आज एक बदल निश्चित आहे. वैयक्तिक कारणांमुळे मुंबई वनडेतून बाहेर असलेला रोहित शर्मा विशाखापट्टणम येथील सामन्यात पुनरागमन करणार आहे. अशा स्थितीत इशान किशनचा पत्ता कट होईल. याशिवाय खेळाडूंच्या कामाचा ताण लक्षात घेऊन संघ व्यवस्थापन काही बदल करू शकते. अशावेळी 10 वर्षांपूर्वी टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळलेल्या वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.

उनाडकटने भारतासाठी शेवटचा सामना 21 नोव्हेंबर 2013 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध 50 षटकांच्या स्वरूपात खेळला होता. यानंतर तो बराच काळ वनडे संघापासून दूर राहिला. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीने त्याने आता संघात आपले स्थान पक्के केले असले तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मोहम्मद शमीने चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेपूर्वी तीन सामने खेळले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात त्याने अनेक षटके टाकली. त्यामुळे त्याच्यावरील खेळाचा ताण लक्षात घेता भारतीय संघ शमीला विश्रांती देऊ शकतो. त्याच्या जागी जयदेव उनाडकट किंवा उमरान मलिकला संधी दिली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट

Back to top button