Latest

आता ATM मध्ये UPI वापरून रोख रक्कम भरता येणार, आरबीआयची घोषणा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : कार्डलेस रोख रक्कम काढण्याच्या सुविधेनंतर आता तुम्ही एटीएममध्ये (ATM) युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या माध्यमातून पैसे जमा करू शकणार आहात. दररोज UPI चा वापर करणाऱ्या अनेक ग्राहकांच्या सोयीसाठी, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने यूजर्संना UPI द्वारे कॅश डिपॉझिट मशीन (CDMs) मध्ये रोख रक्कम जमा करण्याची परवानगी दिली आहे. याबाबतची घोषणा आज आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी केली.

"कॅश डिपॉझिट मशिन्स (CDM) च्या माध्यमातून रोख जमा करणे हे प्रामुख्याने डेबिट कार्डच्या वापराद्वारे केले जात आहे. एटीएममध्ये UPI वापरून कार्डविना रक्कम काढण्यापासून आलेला अनुभव लक्षात घेता, आता UPI चा वापर करुन कॅश डिपॉझिट मशीनमध्ये रोख जमा करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.

यामुळे ग्राहकांची अधिक सोय होईल आणि बँकांनादेखील चलन हाताळणी प्रक्रिया सुलभ होईल. याबाबतचे निर्देश लवकरच जारी केले जातील, असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या तुम्हाला UPI द्वारे एटीएममधून पैसे काढता येतात. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. जेव्हा तुम्ही एटीएम स्क्रीनवर 'UPI कार्डलेस कॅश' पैसे काढण्याचा पर्याय निवडता, तेव्हा तुम्ही किती पैसे काढणार आहात हे विचारले जाते. रक्कम एंटर केल्यानंतर, स्क्रीनवर सिंगल यूज डायनॅमिक QR कोड दिसेल. हे तुम्हाला कोणत्याही बँकेचे मोबाइल बँकिंग ॲप वापरून ते स्कॅन करावे लागेल आणि रोख रक्कम मिळविण्यासाठी UPI पीनसह हा व्यवहार अधिकृत करावा लागेल.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने शुक्रवारी द्वैमासिक पतधोरण जाहीर केले. आरबीआयने सलग सातव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयनेने रेपो दर ६.५ टक्के एवढा 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२४-२५ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ७ टक्के असेल. "जोखीम संतुलित आहे," असेही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. २९ मार्च २०२४ पर्यंत भारताचा परकीय चलनसाठा ६४५.६ अब्ज डॉलर इतका सर्वकालीन उच्चांकावर गेला असल्याचे त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT