Latest

आता लढायचं आणि जिंकायचं! शांतिगिरी महाराजांची अनुष्ठान समाप्ती; अपक्ष लढण्याची तयारी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून महायुतीकडून इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराज यांनी आठ दिवसांचे अनुष्ठान केले होते. अनुष्ठानानंतर त्यांनी अपक्ष निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बाबांच्या भक्त परिवाराने 'खूप केलं नेत्यांसाठी यंदा लढू बाबांसाठी', 'आता लढायचं आणि जिंकायचं' असा नारा दिला. त्यामुळे नाशिकमध्ये महायुती, महाआघाडी व अपक्ष शांतिगिरी महाराज असा तिहेरी सामना रंंगण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा गुंता कायम असताना, युतीकडून इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराजांनी आठ दिवसांचे अनुष्ठान केले. त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी (दि. १६) अनुष्ठानाच्या सांगतेवेळी बाबांचा भक्तपरिवार उपस्थित होता. महायुतीकडून उमेदवारीची शक्यता धूसर असताना अनुष्ठानानंतर शांतिगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. त्याचा प्रत्यय अनुष्ठान समाप्तीवेळी पाहायला मिळाली. उपस्थित भक्तांच्या हाती 'आता लढायचं आणि जिंकायचं', 'खूप केलं नेत्यांसाठी, यंदा लढू बाबांसाठी' अशा आशयाचे फलक पाहायला मिळाले.

देशभरात लोकसभा निवडणुका शांततेत व यशस्वीपणे पार पडाव्यात, यासाठी महाराजांनी अनुष्ठान केल्याचे बाबाजी परिवारात बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथमध्ये अनुष्ठान केले. त्यानंतर नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांनी केलेले अनुष्ठान हा चर्चेचा विषय ठरत आहे. एकप्रकारे महाराजांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याची चर्चा आहे. महाराज निवडणुकीत उतरल्यास नाशिकची लढत अधिक रंगतदार हाेऊ शकते.

उमेदवारांनीही घेतला बाबांचा आशीर्वाद
शांतिगिरी महाराजांचा नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर येथे मोठा भक्तपरिवार आहे. या परिवाराच्या बळावर २००९ साली शांतिगिरी महाराजांनी संभाजीनगरमधून निवडणूक लढविली होती. महाराजांचे मूळ गाव नाशिकमधील असल्याने त्यांचा जिल्ह्यातील दांडगा अनुभव लक्षात घेत भाजपचे उमेदवार डॉ. भारती पवार व डॉ. सुभाष भामरे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे आदींनी मध्यंतरीच्या काळात शांतिगिरी महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT