देवरूखकर वाड्याला भीषण आग; सुदैवाने जीवित हानी नाही | पुढारी

देवरूखकर वाड्याला भीषण आग; सुदैवाने जीवित हानी नाही

पुणे / कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा : बुधवार पेठेतील भाऊ रंगारी गणपती मंदिर परिसरातील जुन्या लाकडी वाड्याला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. येथील अरुंद गल्लीत आग लागल्याने परिसरात घबराट उडाली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. बुधवार पेठ येथील भाऊसाहेब रंगारी गणपतीजवळ असलेल्या देवरूखकर वाड्याला मंगळवारी दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाचे तीन बंब व तीन पाण्याचे टँकर दाखल झाले.

या वाड्यात कोणीही राहात नाही. मात्र, तेथे ट्रॉफी बनविण्याचे साहित्य ठेवले होते. या साहित्याने पेट घेतल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. अग्निशमन दलाचे दहा अधिकारी आणि 40 जवानांनी आग इतरत्र पसरू नये, यासाठी सातत्याने पाण्याचा मारा केला. श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळ असलेल्या गल्लीत खाद्यपदार्थ, रद्दी, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीची दुकाने आहेत. येथील गल्ली अरुंद असल्याने अग्निशमन दलाची वाहने शिवाजी रस्त्यावर थांबवण्यात आली. त्यानंतर मोठ्या पाइपद्वारे आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. या वेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. सुरुवातीला कसबा, नंतर मध्यवर्ती अग्निशमन केंद्र आणि त्यानंतर एरंडवणा अग्निशमन केंद्रातील वाहन आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी, पंकज जगताप, संजय गायकवाड, समीर दळवी, सतीश ढमाले, सुमित खरात यांनी ही कामगिरी बजावली.

वाड्याला तळमजला आणि पहिल्या मजल्यावर आग लागली होती. सध्या येथे कोणी राहात नाही. बक्षिसासाठी दिल्या जाणार्‍या ट्रॉफीचे साहित्य या वाड्यात ठेवण्यात आले होते. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. मात्र, आग मोठी असल्याने जेसीबीही मागविण्यात आला. सातत्याने पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली.

– कमलेश चौधरी, प्रभारी अग्निशमन अधिकारी, कसबा अग्निशामक केंद्र.

हेही वाचा

Back to top button