Latest

North Korea fires missiles | उत्तर कोरियाने आणखी डागली ३ क्षेपणास्त्रे, दक्षिण कोरियासह जपानकडून नागरिकांना केले अलर्ट

दीपक दि. भांदिगरे

सेऊल : पुढारी ऑनलाईन; उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचण्या (North Korea fires missiles) सुरुच असल्याने दक्षिण कोरियात खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाने कमीत कमी २३ क्षेपणास्त्रे डागल्याच्या एका दिवसानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पूर्व समुद्रात एक आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) आणि दोन कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली, असे दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले. याबाबतचे वृत्त योनहाप न्यूज एजन्सी (Yonhap News Agency) ने दिले आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर जपानी सरकारने मध्य जपानमधील रहिवाशांना घरामध्येच राहण्याची सूचना जारी केली आहे.

उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासह तीन क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामुळे दक्षिण कोरियासह जपान सरकारने अलर्ट जारी केला आहे. तसेच येथील रेल्वेसेवा तात्पुरती थांबवली आहे. उत्तर कोरियाने सोडलेली क्षेपणास्त्रे पुन्हा एकदा जपानवरून गेल्याने तणाव वाढला आहे.

जॉइंट चीफ ऑफ स्टाफ (JCS) च्या म्हणण्यानुसार, आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सकाळी ७.४० च्या सुमारास प्योंगयांगमधील सुनान भागातून प्रक्षेपित करण्यात आले आणि त्याने सुमारे १,९२० किमी वेगाने सुमारे ७६० किलोमीटरपर्यंत उड्डाण केले. पण, ही क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी झाली असल्याचे संरक्षण विभागाच्या सुत्रांनी म्हटले आहे. यावर्षी उत्तर कोरियाने डागलेले हे सातवे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून मे महिन्याच्या अखेरनंतरचे पहिले आहे.

JCS ने एका निवेदनात म्हटले आहे की, "आमच्या सैन्य सतर्क असून दक्षता वाढवली आहे." उत्तर कोरियाने एका दिवसात दोन डझनहून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.

उत्तर कोरियाने बुधवारी विविध प्रकारची अनेक क्षेपणास्त्रे डागली होती. (North Korea fires missiles) या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने एअर रेड अलर्ट जारी केला होता. उत्तर कोरियाने बुधवारी समुद्राच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने त्याच्या पूर्वेकडील बेटावर रेड अलर्ट जारी केला. उत्तर कोरियाच्या या आगळिकीमुळे उभय देशांमधील संघर्ष आणखी वाढला आहे. उत्तर कोरियाने चाचणी घेण्यासाठी डागलेली क्षेपणास्त्रे दक्षिण कोरियाच्या समुद्री पाण्याच्या हद्दीजवळ पडल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या सैन्यदलाने दिली आहे.

उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्याने उलेयुंगडो बेटावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ (जेसीएस) ने नागरिकांना बंकरमध्ये जाण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियाने आज विविध प्रकारची किमान १० क्षेपणास्त्रे पूर्व आणि पश्चिमेच्या दिशेने डागली. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियाला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिल्याचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफने म्हटले आहे. दक्षिण कोरियाने म्हटले आहे की उत्तर कोरियाने डागलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पहिल्यांदाच वादग्रस्त सागरी सीमेच्या दक्षिणेस आणि दक्षिण कोरियाच्या समुद्रातील पाण्याच्या हद्दीजवळ पडले आहे.

"उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी असामान्य आणि अस्वीकार्य आहे. कारण त्यांनी डागलेली क्षेपणास्त्रे उत्तर सीमा रेषा ओलांडून दक्षिणेकडील दक्षिण कोरियाच्या समुद्री पाण्याच्या हद्दीजवळ येऊन पडली आहेत. हे पहिल्यांदाच असे घडले आहे," अशी माहिती जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे ऑपरेशन्स डायरेक्टर कांग शिन-चूल यांनी दिली आहे. "उत्तर कोरियाने पूर्व समुद्राच्या दिशेने तीन लहान-पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली, ज्याला जपानचा समुद्रदेखील म्हणतात," असे जेसीएसने एका निवेदनात म्हटले आहे.

दक्षिण कोरियाने दिले चोख प्रत्युत्तर

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने काल बुधवारी चोख प्रत्युत्तर दिले होते. दक्षिण कोरियाच्या लष्कराने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या तीन क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. दक्षिण कोरियाने म्हटले आहे की त्यांची तीन क्षेपणास्त्रे सागरी सीमेच्या त्याच भागात डागण्यात आली जिथे उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे येऊन पडली होती. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सूक-येओल यांनी उत्तर कोरियाने सीमा रेषेचे उल्लंघन करणे हे आक्रमण असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT