Latest

Fuel Price Politics : बिगर भाजपशासित राज्यांकडून इंधन दर कपातीवरून दिशाभूल

अमृता चौगुले

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा :  इंधन दर कपातीच्या मुद्द्यावरून बिगर भाजपशासित राज्यांतील सत्ताधार्‍यांकडून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांनी सोमवारी (दि. 23) केला.

केंद्राकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्कात कपात केली असताना आम्ही राज्यांच्या करात कपात केली असल्याचे काही राज्ये सांगत आहेत. शिवाय, केंद्राच्या कपातीचा किरकोळच फायदा लोकांपर्यंत पोहोचविला जात असल्याचा आरोप पुरी यांनी सोशल मीडियाद्वारे केला आहे.

महाराष्ट्र, राजस्थान तसेच केरळमधील काही सत्ताधारी नेते केंद्राने केलेल्या इंधन दर कपातीचे श्रेय घेऊ पाहत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाचे अजिबात आश्‍चर्य वाटलेले नाही, असे सांगत पुरी म्हणाले की, सध्या झालेल्या इंधन दर कपातीचा राज्यांशी काहीही संबंध नाही. गेल्या नोव्हेंबर महिन्यात ज्यावेळी केंद्राने भरीव उत्पादन शुल्कात कपात केली होती, त्यावेळीदेखील बिगर भाजपशासित राज्यांनी लोकांना दिलासा दिला नव्हता. दुसरीकडे, भाजपशासित राज्यांनी कर कपात लागू करून लोकांना लाभ करून दिला होता.

गेल्या शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांची, तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 6 रुपयांची कपात केली होती. यानंतर महाराष्ट्र सरकारने रविवारी पेट्रोलवरील व्हॅट शुल्कात 2.08 रुपयांची, तर डिझेलवरील शुल्कात 1.44 रुपयांची कपात केली होती. यामुळे अडीच हजार कोटींचा भार सोसावा लागणार असल्याचा दावाही राज्य सरकारने केला होता. तिकडे राजस्थान सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 2.48 रुपयांची, तर डिझेलवरील व्हॅटमध्ये 1.16 रुपयांची नाममात्र कपात केली होती. तर केरळने वरील दोन्ही शुल्कात क्रमशः 2.41 आणि 1.36 रुपयांची कपात केली होती.

हेही वाचा  

SCROLL FOR NEXT