Latest

Nipani Robbery : निपाणी तालुक्यातील सौंदलगा येथे बनावट दागिने ठेवून ३ कोटींची फसवणूक

backup backup

निपाणी ; पुढारी वृत्तसेवा : बनावट दागिने ठेवून बँकेची तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत नोंद झाली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. 87 जणांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. (Nipani Robbery)

सौंदलगा येथे मध्यवर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून युनियन बँकेची शाखा भाडोत्री इमारतीत कार्यरत आहे. यापूर्वी ही बँक कार्पोरेशन बँक म्हणून ओळखली जात होती. अलीकडेच या बँकेचे विलीनीकरण झाले आहे.

7 जुलै 2021 रोजी तत्कालीन बँकेचे मॅनेजर बदलून नरेश आप्पासाहेब हलकर्णी यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर श्री. हलकर्णी यांनी बँकेतून सोने ठेवून कर्जाऊ रक्कम उचल केलेल्या कर्जदारांच्याकडे वसुली चालवली होती.

दरम्यान, सोने ठेवून कर्ज ठेवलेल्या 87 जणांनी बनावट सोने ठेवून बँकेची फसवणूक केल्याचे हलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यानुसार हलकर्णी यांनी ही बाब वरिष्ठांच्या नजरेस आणून दिली.

त्यानंतर बँकेच्या वरिष्ठांनी लेखा परीक्षणाला तातडीने सुरुवात केली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये एकूण 87 जणांनी आपल्या मालकीचे सोन्याचे बनावट दागिने ठेवून 3 कोटी रुपयांची उचल केल्याचे दिसून आले.

ही बाब लक्षात येताच बँकेचे मॅनेजर नरेश हलकर्णी यांनी याबाबत निपाणी ग्रामीण पोलिसात 87 जणांविरोधात फिर्याद दिली.

या प्रकरणाची जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, डीएसपी मनोजकुमार नायक यांनी गंभीर दखल घेतली त्यानुसार सीपीआय संगमेश शिवयोगी व ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार यांनी हलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार 87 जणाविरोधात गुन्हा दाखल करून तपास चालवला आहे.

87 जणांनी फसवणूक कशी केली, बँकेने इतक्या लोकांचे बनवाट दागिने कसे स्वीकारले, हेही प्रश्न असून त्याचाही तपास सुरू आहे.

तपास यंत्रणेने कमालीची गुप्तता पाळून या प्रकरणाचा तपास चालविला असून लवकरच या प्रकरणातील मुख्य आरोपींना गजाआड करण्यात येईल ,अशी माहिती उपनिरीक्षक अनिलकुमार यांनी दिली.

Nipani Robbery : सहकार क्षेत्रात खळबळ…..

सौंदलगा येथील राष्ट्रीयीकृत असलेल्या युनियन बँकेत बनावट सोन्या ठेवून तीन कोटीची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीला आल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.यामध्ये अनेक खाजगी व सहकारी बँकांनी अशाप्रकारे सोने ठेवून कर्जाऊ रक्कम दिली आहे. या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

सराफाची पडताळणी चर्चेत….

बँकेतून 87 जणांनी बनावट सोने ठेवून 3 कोटींची रक्कम उचलली आहे.हे जरी खरे असले तरी या बँकेतून 87 जणांना सोने ठेवून कर्ज देण्यासाठी बँकेने विश्वासाने नेमलेल्या संबंधित सराफाने कशाप्रकारे दागिन्याची पडताळणी केली. शिवाय संबंधित सराफाला कोण पाठीशी घातले, याचा उलगडा होणे गरजेचे आहे. तरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागण्यास तपास यंत्रणेला यश येणार आहे.

तपासासाठी विशेष पथकाची स्थापना….

इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट सोने देऊन फसवणूक झाल्याने हे प्रकरण तपास यंत्रणेने मोठे गांभीर्याने घेतले असून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
– संगमेश शिवयोगी, सीपीआय निपाणी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT