Latest

New Parliament Inauguration : पंडित नेहरूंना स्वातंत्र्याच्या १५ मिनिटे आधी मिळालेला राजदंड येणार नरेंद्र मोदींच्या हाती!

अमृता चौगुले

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नवीन संसदेच्या उद्घाटनाला तामिळनाडूतील विद्वान पुरोहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेंगोल प्रदान करतील. सेंगोल हा एक राजदंड आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट 1947 ला रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो प्रदान करण्यात आला होता. पुढे हा राजदंड गायबच झाला. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोधून काढलेला असून, नव्या संसदेत सत्तांतराच्या भारतीय परंपरेच्या प्रतीकाची स्थापना होणार आहे. नेहरूंच्या नंतर प्रथमच हा राजदंड नरेंद्र मोदी स्वीकारतील. (New Parliament Inauguration)

सेंगोलचा इतिहास काय? तो नेहरूंना का देण्यात आला? आणि आता पंतप्रधान मोदींना तो का देण्यात येणार आहे?, हे सारे प्रश्न कुणालाही पडणे स्वाभाविक आहे… तर हा त्यांच्या उत्तरांचा मागोवा… (New Parliament Inauguration)

नेहरू-सेंगोलची गोष्ट… (New Parliament Inauguration)

देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव एखाद्या विशिष्ट प्रतीकातून साजरा व्हावा, असे तुम्हाला वाटत असेल तर तसे सांगा, असे भारताचे अंतिम ब्रिटिश व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित नेहरूंना विचारले होते. नेहरूंनी मग सी. राजगोपालाचारी यांना याबाबत विचारणा केली. राजगोपालाचारी तत्कालीन मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री होते. राजदंडाच्या परंपरेबाबत त्यांनी नेहरूंना माहिती दिली. भारतीय परंपरेनुसार राज्याचे मुख्य पुरोहित (राजगुरू) नवीन राजाला सत्ताग्रहणप्रसंगी राजदंड देतात, असे राजगोपालाचारींनी नेहरूंना सांगितले. नेहरूंनी मग त्यासाठीची व्यवस्था करा म्हणून सांगितले. राजगोपालाचारी यांनी तिरुवदुथुराई अधीनम मठ गाठले. मद्रास प्रांतातील एका सुवर्णकाराला सोन्याचा राजदंड बनवायला सांगितला. तिरुवदुथुराई अधीनम मठाचे राजपुरोहित श्री ला श्री अंबालावन देसिका स्वामीगल यांचे प्रतिनिधी श्री ला श्री कुमारस्वामी थंबीरन राजदंडासह एका विशेष विमानाने दिल्लीला गेले होते. स्वातंत्र्याच्या 15 मिनिटे आधी, थंबीरन यांनी माऊंटबॅटन यांना राजदंड सुपूर्द केला. यावेळी पुरोहिताने एक भजन गायले. नम्रता हा गुणच स्वर्गावर अधिराज्य गाजवेल, अशी आम्ही आज्ञा करतो, असा या भजनाच्या शेवटच्या ओळीचा आशय आहे. राज्य हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून माऊंडबॅटन यांनी हा सेंगोल मग नेहरूंना दिला. सत्तांतरण सोहळ्यानंतर हा राजदंड अलाहाबादच्या (आताचे प्रयागराज) संग्रहालयात ठेवण्यात आला. दुर्मीळ कला म्हणून संग्रहात ठेवलेला हा राजदंड आजवर नेहरूंची सोन्याची काठी म्हणून ओळखला जात होता.

अलीकडेच चेन्नईतील एका गोल्डन कोटिंग कंपनीने प्रयागराज म्युझियम प्रशासनाला या काठीबद्दलची माहिती दिली. ही नुसतीच नेहरूंची काठी नसून, सत्ता हस्तांतरणाचा राजदंड आहे, असे त्यात नमूद केले होते.

चेन्नईत बनला राजदंड

वुमिदी बंगारू ज्वेलर्स या चेन्नईमधील प्रतिष्ठानाने आपल्या संकेतस्थळावर माऊंटबॅटन यांनी नेहरूंना हस्तांतरित केलेला राजदंड आम्ही (वुमिदी) बनविल्याचा दावा केला आहे. वुमिदी कुटुंबाची पाचवी पिढी आजही याच व्यवसायात आहे. हे कुटुंब जवळपास 120 वर्षांपासून चेन्नईत आहे. त्याआधी या कुटुंबाचे पूर्वज वेल्लोरच्या एका गावात दागिने बनवत असत.

आता नव्या संसदेत हाच राजदंड!

  • आता नव्या संसदेत हा राजदंड सभापतींच्या खुर्चीजवळ ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
  • नवीन संसदेच्या उद्घाटनानिमित्त तो विधिवत पंतप्रधान मोदी यांच्याकडे सुपूर्द केले जाईल.
  • 1947 मध्ये नेहरूंच्या सोहळ्याला उपस्थित तमिळ पुरोहित (सध्या वय 96) मोदींना राजदंड देताना हजर राहाणार आहेत.

राजदंडाची भारतीय परंपरा

  • मौर्य साम्राज्याच्या काळात (ख्रिस्तपूर्व 322 ते 185) पहिल्यांदा सत्तांतरात राजदंडाच्या वापराचे पुरावे.
  • गुप्त साम्राज्य (320 ते 550), चोल साम्राज्य (907 ते 1310) आणि विजयनगर साम्राज्यात (1336 ते 1646) राजदंडाचा वापर होत असे.
  • मोदींनी घेतला मागोवा; सत्तांतराच्या भारतीय प्रतीकाची होणार पुनर्स्थापना
  • सेंगोल म्हणजेच राजदंड, सेंगोल चांदीचा, त्यावर सोन्याचा मुलामा
  • भगवान शंकराचा नंदीही राजदंडावर विराजमान, सेंगोल 5 फुटांचा
  • नेहरूंच्या सत्ताग्रहणाचे एक साक्षीदार हजर राहणार मोदींच्या सोहळ्यालाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेंगोलबद्दल जशी माहिती मिळाली तसे त्यांनी याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीतून जे समोर आले ते थक्क करणारे होते.
– अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT