Latest

पुणे शहर राष्ट्रवादीचा शरद पवार यांना पाठिंबा

अमृता चौगुले

पुणे, पुढारी ऑनलाईन: राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी दोन जुलैला दोन गट तयार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला आहे. त्यानंतर आपल्या गटातील आमदारांसह ते राजभवनावर पोहचले. अजित पवार यांच्यासोबत नऊ जण एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडीनंतर शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. पवार यांनी राज्याचा दौरा करुन पक्षबांधणी करण्याची घोषणा केली. या दरम्यान पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत कोणत्या गटात जावे? यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षात फूट पाडणाऱ्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध करण्यात आला. तसेच या काळात खासदार शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा शहर कार्यकारीणीत ठराव करण्यात आला. आपण सर्वजण पवार साहेबांसोबत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश बैठक मुंबईत ५ जुलै रोजी होणार आहे. या बैठकीला आपण जाणार आहोत. सकाळी १० पर्यत मुंबईत पोहचा अन् पुणे शहर पवार यांच्यासोबत आहे, हे दाखवून द्या, असे जगताप यांनी सांगितले. सध्या आपण कायदेशीर लढाई लढत आहोत. त्यामुळे प्रतीज्ञापत्र आलेले आहेत, ते घेऊन जा, असे प्रशांत जगताप यांनी शहर पदाधिकाऱ्यांना सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा इतर नेत्यावर कुठलेही आरोप किंवा टीका करू नका. खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या वक्तव्यात टीका केलेली नाही. सोशल मिडियावरून आपल्या काही संदेश द्यायचे असतील तर ते अधिकृतरित्या पाठवण्यात येतील. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. तसेच पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयाचा करार माझ्या नावाने आहे, त्यामुळे कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रश्नच येत नाही. या कार्यालयाचा ताबा कुणी घेणार नाही, घेतला तर मला पोलीस तक्रार देण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT