Latest

NCP Meet @ Delhi : ‘राष्ट्रवादीचा अध्यक्ष मीच’- शरद पवार; पटेल, तटकरे यांचे निलंबन; वाचा दिल्ली बैठकीतील महत्वाचे निर्णय

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : NCP Meet @ Delhi : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष फोडणाऱ्यांना आगामी काळात त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल, असा सज्जड इशारा शरद पवार यांनी फुटीर गटाला दिला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच राष्ट्रवादीचा अध्यक्ष मीच आहे, असेही त्यांनी ठणकावले. दरम्यान शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 आमदारांचे तसेच प्रफूल्ल पटेल, सुनील तटकरे या दोन खासदारांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे दिल्लीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वावर कार्यकारिणी सदस्यांनी विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर अजित पवार यांनी दावा ठोकलेला आहे, असे विचारले असता शरद पवार यांनी 'अध्यक्ष मीच आहे आणि कोणी दावा करीत असेल तर त्यात तथ्य नाही', असे सांगितले. अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. मात्र आमचा आयोगाच्या कामावर विश्वास असून तेथे न्याय होईल. पुढील कायदेशीर संस्थांकडे जावे लागणार नाही, असे पवार म्हणाले.

कार्यकारिणी बैठकीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांचे मनोबल उंचावलेले होते. पक्षाला पुन्हा चांगल्या सि्थतीत आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे सांगत पवार पुढे म्हणाले की, काही लोकांनी पक्षाला नुकसान पोहोचविले आहे. मात्र राज्यात प्रत्येक स्तरावर आम्हाला जनतेचे समर्थन आहे. भाजपने सत्ता काबीज केल्यानंतर ईडी, सीबीआय व इतर तपास संस्थांच्या माध्यमातून विरोधकांना प्रताडित केले आहे. निवडणुकांचे घोडामैदान जवळ आहे, सत्ताबदल झाल्यानंतर आताच्या सत्ताधाऱ्यांना त्याची किंमत द्यावी लागेल.

प्रफूल्ल पटेल यांना तुम्ही कार्यकारी अध्यक्ष केले, छगन भुजबळ यांच्याकडे महत्वाची जबाबदारी दिली, मात्र त्यांनीच फुटीत सहभाग घेतला व तुम्हाला कानोकान खबर लागली नाही, असे विचारले असता 'तपास संस्था इतक्या प्रभावी असतील' याची कल्पना नव्हती, असे उत्तर शरद पवार यांनी दिले.

* वय 82 असो की 92, त्याने फरक पडत नाही… 

अजित पवार यांनी तुमच्या वयाचा मुद्दा उपसि्थत करीत आतातरी निवृत्त व्हा, असा सल्ला दिला आहे. असे सांगितले असता शरद पवार यांनी 'वय 82 असो की 92 त्यामुळे कामावर फरक पडत नाही' अशा शब्दात उत्तर दिले. अजित पवार गटाने राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक नियमबाह्य असल्याचे म्हटले होते, यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना पवार यांनी पक्षाच्या घटनेनुसारच ही बैठक झाली आहे, असे स्पष्ट केले. अजित यांनी आपली मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा बोलून दाखविली आहे, असे सांगितले असता 'कुणाला मुख्यमंत्री व्हायचे असते, कुणाला पंतप्रधान तर कुणाला उपपंतप्रधान…या विषयावर मी बोलणार नाही', असे पवार म्हणाले.

कार्यकारिणीत बैठकीस खा. सुप्रिया सुळे, खा. फौजिया खान, पी. सी. चाको, योगानंद शास्त्री, जितेंद्र आव्हान, हरियानाचे वीरेंद्र वर्मा आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. यावेळी पक्षविरोधी कारवाया केल्याचे सांगत एस. आर. कोहली यांचेही निलंबन करण्यात आले. बैठकीनंतर पी. सी. चाको म्हणाले की, पक्षाच्या सर्व 27 राज्यांच्या शाखा शरद पवार यांच्यासोबत आहेत. एकही शाखा अजित पवार यांच्या पाठिशी नाही. बैठकीत आठ ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत.

* शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब….

कार्यकारिणी बैठकीत आठ ठराव मंजूर करण्यात आले. त्यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकारिणीने शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याच्या ठरावाचा समावेश आहे, असे पी. सी. चाको यांनी सांगितले. बहुतांश आमदार अजित पवार यांच्या बाजुने असल्याची चर्चा आहे, असे विचारले असता शरद पवार यांनी फक्त आमदार म्हणजे पक्ष, हा निकष नसल्याचे सांगितले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सत्ता संघर्षावर निकाल देताना फक्त आमदार हे पक्ष ठरविण्याचे निकष नाहीत, हे स्पष्ट केले आहे. पक्षाच्या पुढील रणनीतीवर कार्यकारिणी बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान कार्यकारिणी बैठकीला 25 पैकी 22 सदस्य उपसि्थत होते, अशी माहिती जितेंद्र आव्हान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT