Latest

NCP Dispute: अजित पवारांनी भाजपसाेबत जाण्याचा घेतलेला निर्णय अचानक नाही : सुनील तटकरे

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली २ जुलै, २०२२ मध्ये आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली; पण हा निर्णय अचानक घेण्‍यात आला नव्‍हता, असे स्पष्ट करत यापूर्वी देखील अनेकवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठींबा देण्याचे प्रयत्न झाले होते, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज (दि.५) स्पष्ट केले. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (NCP Dispute)

२०१९ मध्‍ये काही कारणास्त शक्य झाले नाही…

राष्‍ट्रवादी काँग्रेस सरकारमध्‍ये का सहभागी झाले? यामागील भूमिका गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर समजावी म्हणून आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यव्यापी दौरा करत आहे, असे स्‍पष्‍ट करत या वेळी तटकरे म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 'एनडीए'मध्ये जाण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे आम्ही भाजपसोबत गेल्याची टीका टीपणी करण्यात  आली; पण २०१९ मध्ये विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या सर्वच आमदारांनी एकमताने सरकारमध्ये जाण्याची भूमिका घेतली होती. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समिती देखील नेमण्यात आली होती. यामध्ये प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटील हे होते; पण त्यावेळी काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता आली. (NCP Dispute)

आम्ही भाजप युतीत गेलो तर आमचे काय चुकले?

२०१९ मध्ये एकत्रित शिवसेना भाजपने निवडणूक लढवली. एकहाती सत्ता असताना दोन्ही पक्षात वितुष्ट आले. मात्र सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षानेसुध्दा शिवसेनेला पाठिंबा दिला आणि आम्हीही दिला हे सांगतानाच २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपसोबत जाण्यासाठी तयार होते तशा सह्या देखील झाल्या होत्या. परंतु निर्णय झाला नाही. आघाडीच्या राजकारणात भिन्न विचारसरणीचे पक्ष असले तरी भिन्न विचाराचे लोक एकत्र येतात. २०१९ मध्ये आम्ही शिवसेनेसोबत युती करु शकतो तर मग आता आम्ही भाजप युतीत गेलो तर आमचे काय चुकले? असा सवाल देखील टीका करणाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला.

भाजपने पाठिंबा मागितला नसताना बाहेरुन पाठिंबा द्यायला सांगण्यात आले

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकींचा निकाल हाती यायचा होता. आम्ही पवारसाहेबांकडे बसलो होतो. त्यावेळी भाजपने पाठिंबा मागितला नव्हता तरी देखील आम्हाला भाजपला बाहेरुन पाठिंबा द्यायला सांगण्यात आले. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी प्रफुल्ल पटेल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मी तेव्हा देखील पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होता. तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला पाठींबा असल्याची घोषणा केली; पण तेव्हा देखील काही अडचणी निर्माण झाल्‍या. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली २ जुलै २०२२ रोजी आम्ही एनडीए सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार आणि नेत्यांनी घेतलेला निर्णय हा अचानक नव्हता  (NCP Dispute) असे तटकरे यांनी सांगितले.

आत्मकेंद्रित राजकारणामुळे पक्ष वाढला नाही

बंडखोरी ज्यांच्या रक्तात आहे ते बंगल्यावरील नेते आम्हाला फुले – शाहू – आंबेडकरांचे विचार शिकवायला लागले आहेत. पक्षनिष्ठा कुणी आम्हाला शिकवू नये. आत्मकेंद्रित राजकारणामुळे इथे पक्ष वाढला नाही, असा आरोप देखील सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांवर केला. आपली जागा निवडून आणण्यापलीकडे काही करु शकत नाही त्यांनी अजित पवार यांच्यावर बोलू नये. शिवसेनेसोबत युती केली त्यावेळी काही वाटले नाही आणि भाजपसोबत युती केली तर आम्हाला नावे ठेवत आहेत, असेही ते म्हणाले.

आगामी निवडणूकीत ५५ हून अधिक जागा जिंकण्‍याचे आमचे लक्ष्य

आगामी निवडणूकीत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए म्हणून लढणार आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत ५५ हून अधिक जागांचे आमचे लक्ष्य असणार आहे, असेही प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रीय सचिव सुधाकर जैन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT