Latest

NCP Crisis | एकीकडे साहेबांना दैवत आणि दुसरीकडे कट…, आव्हाडांची पोस्ट चर्चेत

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच स्थित्यंतर होवून गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अजित पवार गट बाजुला होत भाजपशी युती करत सत्तेत आला. आता अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात राष्ट्रवादी कोणाची? हा वाद सुरु असून यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. एकीकडे अजित पवार यांचा गट राष्ट्रवादीवर आपला हक्क सांगत आहे. यावरुन अजित पवार आणि शरद पवार गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट करत अजित पवार गटाचे नाव न घेता निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, " साहेबांना दैवत्व बहाल करू नका." (NCP Crisis)

NCP Crisis : साहेबांना दैवत्व बहाल करू नका…

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं आहे की, "एकीकडे साहेबांना दैवत म्हणायचे आणि दुसरीकडे, त्यांना घरातून बाहेर काढायचे कट रचायचे. त्यांनी आपला पक्ष आणि निशाणी देशभर पसरविली आहे. साहेबांनी पक्षाला आणि पक्ष चिन्हाला देशभर अधिष्ठान दिले आहे. त्यांनी जन्म दिलेला पक्ष आणि त्यांनी निर्माण केलेली निशाणी ताब्यात घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न तुम्ही करीत आहात आणि त्यांना दैवत्व बहाल करत आहात. साहेब हे पुरोगामी विचारांचे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जीवाचे रान करणारे माणूस आहेत. कृपया, त्यांना दैवत्व बहाल करू नका. निदान आमच्यासाठी ते हदय असलेले माणूस आहेत."

आव्हाडांच्या या पोस्टनंतर अजित पवार गट काय प्रतिक्रिया देणार याकडे राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चा होवू लागली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT