Latest

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावात मोठा झटका

अंजली राऊत

जळगाव: पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, राष्ट्रवादीचे संचालक संजय पवार यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीत फूट पडल्याने संजय पवार विजयी झाले आहेत. जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने शनिवारी (दि. 11) निवडणूक झाली. बँकेत महाविकास आघाडी व शिवसेना शिंदे गट यांची संयुक्त सत्ता होती, महाविकास आघाडीकडे अध्यक्षपद तर शिंदें गटाकडे उपाध्यक्षपद राहणार, असा फॉर्म्युला ठरला होता. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अ‍ॅड. रवींद्र पाटील, संजय पवार, डॉ. सतीश पाटील व प्रदीप देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, रवींद्र पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले, असे असतानाही संजय पवार यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. त्यांना भाजप, शिंदे गट आणि काँग्रेसच्या सदस्यांनी मतदान केल्यामुळे ते 11 मते मिळवून विजयी झाले आहेत. तर रवींद्र पाटील यांना 10 मते मिळाली आहेत. उपाध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटांचे अमोल चिमणराव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या बैठकीत अमोल पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार त्यांची बिनविरोध निवड झाली.

काँग्रेस, शिवसेनेकडून विश्वासघात: खडसे
महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. राष्ट्रवादीची 11 पैकी 10 मते पक्षासोबत राहिली. एकाने बंडखोरी केली. काँग्रेस व शिवसेनेने विश्वासघात केल्याने जेडीसीसीत महाविकास आघाडीचा घात झाला, अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT