अमेरिकेत उंदरांमध्ये पसरतोय कोरोना विषाणू; संक्रमित उंदीर माणसांच्या संपर्कात येण्याची शक्यता, संशोधनात दावा | पुढारी

अमेरिकेत उंदरांमध्ये पसरतोय कोरोना विषाणू; संक्रमित उंदीर माणसांच्या संपर्कात येण्याची शक्यता, संशोधनात दावा

न्यूयॉर्क : अमेरिकेतील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या न्यूयॉर्क शहरातील उंदरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. एका नव्या संशोधनात हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

न्यूयॉर्कमध्ये सुमारे 80 लाख उंदीर असल्याचा अंदाज आहे. एम्बियो-अमेरिकन फॉर मायक्रोबायोलॉजीच्या ओपन-एक्सेस जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, न्यूयॉर्कच्या उंदरांना कोव्हिडच्या तीन व्हेरिएंटचा संसर्ग होऊ शकतो.

या संशोधनात असाही दावा करण्यात आला आहे की, कोव्हिड संक्रमित उंदीर माणसांच्या संपर्कात येण्याची शक्यता खूप जास्त आहे. यामुळे प्लेगच्या आठवणी ताज्या होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. हा विषाणू उंदरांद्वारे मानवांमध्येही पसरला आणि 1347 ते 1351 या काळात युरोपमध्ये मोठी मनुष्य हानी झाली होती. तथापि, रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्र (उऊउ) ने स्पष्ट केले की, कोरोना व्हायरस प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

या संशोधनाचे प्रमुख डॉ. हेन्री वॅन यांनी सांगितले की, हे नवे संशोधन कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी यासंदर्भात आणखी अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. मिसुरी विद्यापीठातील सेंटर फॉर इन्फ्लूएंझाचे संचालक डॉ. हेन्री व्हॅन म्हणाले, कोरोनाचा विषाणू प्राण्यांमध्ये पसरत आहे. तसेच तो नव्या स्वरूपामध्ये विकसित होत आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी आणखी संशोधन करणे आवश्यक आहे.

Back to top button