Latest

नाशिक : जिवंत रुग्णाला मृत ठरविण्याचा प्रकार, डॉक्टरची होणार चौकशी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिवंत रुग्णाला मृत ठरविण्याचा प्रकार गुरुवारी (दि.२५) जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून घडला होता. त्यामुळे रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तथ्य व सत्य परिस्थितीचा सविस्तर अहवाल विभागप्रमुखांच्या अभिप्रायासहित सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी शुक्रवारी (दि.२६) वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना दिले आहेत. त्यामुळे डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.

अशोकस्तंभ परिसरातील युवकाने स्वत:वर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले होते. ९३ टक्के भाजल्याने त्यास उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या उपचाराला ज‌खमी युवकाकडून कमी प्रमाणात प्रतिसाद दिला जात होता. त्यातच वॉर्डमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थी डॉक्टरने वैद्यकीय तपासणी करीत इसीजी रिपोर्ट फ्लॅट आल्याने त्यांनी नातेवाइकांना रुग्णाचे निधन झाल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रुग्णालयाच्या आवारातील पोलिस चौकीत रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

दरम्यान, डॉक्टरांनी घोषित केलेल्या मृत रुग्णाच्या पायांची मंद हालचाल होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी रुग्णाचा पुन्हा इसीजी केला. त्यात हृदयाचे ठोके आल्याने रुग्ण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले होते. ही माहिती कळल्यानंतर नातेवाइकांनी संताप व्यक्त करत संबंधित डॉक्टरच्या चौकशीची मागणी केली होती. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन संबंधित डॉक्टराच्या चौकशीचे आदेश काढले आहेत.

संबंधित युवकाचा मृत्यू

अशोकस्तंभ परिसरात राहणाऱ्या नितीन सुरेश मोरे (४१) याने मोटो व्ही नावाच्या दुकानात स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. त्यात त्याचा चेहरा, छाती आणि डोके आदी भाग भाजला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान नितीनची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT